पावसाळा आणि गणेशोत्सवात मुंबईतील खड्डय़ांबाबत होत असलेली ओरड आता थंडावली असली तरी रस्त्यांवरील खड्डे मात्र अजूनही कायम आहेत. मुसळधार पावसाचे दिवस संपल्यावरही महानगरपालिकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार शहरात अजूनही ५७२ खड्डे बाकी आहेत. त्यामुळे मुंबईकरांना खड्डय़ांना चुकवतच रस्त्यांवरून मार्ग काढावा लागत आहे.
निवडणुकांचे वर्ष असल्याने रस्ते गुळगुळीत ठेवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले गेले. मात्र तरीही मुंबईच्या रस्त्यांवर आतापर्यंत १४ हजाराहून अधिक खड्डे नोंदले गेले आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत यावेळी खड्डय़ांची संख्या कमी असली तरी ऐन पावसाळ्यात गणेशोत्सवापूर्वी नोंद केलेले व बुजवलेले खड्डे यांच्या संख्येची तुलना करता कोणत्याही दिवशी किमान हजार खड्डे शहरात असल्याचे दिसत होते.
पालिकेच्या वेबसाइटवरील खड्डय़ांच्या नोंदीत सप्टेंबरमध्ये आणखीन वाढ झाली. खड्डे बुजवण्याच्या कंत्राटदारांना अधिक पैसे मिळवून देण्यासाठी खड्ड्यांची संख्या वाढवल्याचा आरोप पालिकेवर झाला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ही आरोपही थंडावले. मात्र खड्डे अजूनही कायम आहेत. पाच ऑक्टोबर पर्यंत झालेल्या नोंदीत शहरात एकूण १४,४२५ खड्ड्े सापडले. त्यातील आतापर्यंत १३,८५३ खड्डे बुजवले गेले आहेत. ५६२ खड्डे अजूनही मुंबईच्या रस्त्यांवर आहेत.
मात्र ही खड्डय़ांची अधिकृत नोंद असून प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी अधिक खड्डे शहराच्या रस्त्यांवर असण्याची शक्यता आहे. पालिकेव्यतिरिक्त एमएमआरडीए, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा संस्थांच्या रस्त्यांवर नोंद झालेल्या ९६ खड्डय़ांवर कोणती कारवाई केली याची माहितीही उपलब्ध नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा