मुंबई : दागिने व्यवसायाच्या आडून विकण्यात येत असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेटचा (ई-सिगारेट) साठा जप्त करण्यात आला. या कारवाईत सुमारे ३० लाखांचा ई-सिगारेटचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने या कारवाईत फैजल मोतीवालाविरुद्ध लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, मंगलदास मार्केटमध्ये फैजलने मोठ्या प्रमाणात ई-सिगारेटचा अनधिकृत साठा वितरण आणि विक्रीसाठी आणला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष दोनला मिळाली होती. त्यानुसार, कक्ष दोनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या नेतृत्वात महिला पोलीस निरीक्षक वैशाली पवार आणि पोलीस उपनिरीक्षक संजय भावे यांच्या पथकाने ई-सिगारेट ठेवलेल्या दुकानावर छापा टाकून कारवाई केली.
दुकानात २०० ई-सिगारेट असलेला बॉक्स सापडले. चौकशीत फैसलने ई-सिगारेटचा साठा त्याच्या आग्रीपाडा येथील फ्लॅटमध्ये ठेवला असून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे तो ई-सिगारेट दुकानात आणून विकत असल्याचे उघड झाले. गुन्हे शाखेच्या पथकाने मोतीवाला याच्या फ्लॅटमधून एकूण ८०० ई-सिगारेट असलेले चार बॉक्स जप्त केले. या ई – सिगारेटची किंमत जवळपास ३० लाख आहे.