केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या जावयाची चोरीला गेलेली गाडी अखेर त्यांची कन्या प्रणिती शिंदे यांच्या प्रसंगावधानामुळे नाटय़मयरित्या सापडली आहे.  ही गाडी शुक्रवारी पहाटे चोरीला गेली होती. शनिवारी रात्री वांद्रे येथून जाणाऱ्या प्रणिती शिंदे यांना ती रस्त्यात दिसली. त्यानंतर त्यांनी तिचा पाठलाग करत ती ताब्यात घेतली. परंतु चोराने पळ काढला.
सुशिलकुमार शिंदे याचे जावई राज श्रॉफ यांच्या मालकिची पजेरो ही आलिशान गाडी शुक्रवारी पहाटे चोरीला गेली होती. शुक्रवारी शिंदे यांच्या कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे या सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून मुंबईला येणार होत्या. त्यांना रेल्वे स्थानकातून आणण्यासाठी त्यांचा वाहनचालक विजय खरात याने ही गाडी आपल्या घरी नेली होती. परंतु पहाटे पाचच्या सुमारास त्याच्या घरासमोरुन ही गाडी चोरीला गेली. खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांच्या जावयाचीच गाडीच चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करून नाकाबंदीही केली. मात्र, गाडी सापडली नाही.
दरम्यान, शनिवारी रात्री प्रणिती शिंदे पाली हिल येथून वरळी येथे जात होत्या. त्यावेळी योगायोगाने विजय खरात हाच त्यांची गाडी चालवत होता. लीलावती सिग्नल येथे प्रणिती यांना चोरीला गेलेली पजेरो गाडी समोरून जाताना दिसली. त्यांनी त्वरित गाडीचा पाठलाग केला. प्रणिती शिंदे यांच्या सुरक्षा रक्षकाने पजेरो गाडीवर हात मारून ती थांबविण्याचा प्रयत्न केला.आपला पाठलाग होतोय हे समजताच चालकाने पजेरो गाडी उलट मार्गाच्या दिशेने वळविली आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला. प्रणिती यांनी त्वरित नियंत्रण कक्षाला फोन करुन हा प्रकार कळविला. घटनास्थळी तात्काळ पोलिसांची कुमक रवाना झाली. पण त्या अज्ञात चोराने वांद्रे येथील अलियावर जंग मार्गाजवळील लाल माती झोपडपट्टी परिसरात गाडी सोडून पळ काढला. पजेरोमध्ये चोराची चप्पल सापडली असून वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले होते. पण त्याचा विशेष उपयोग झाला नाही.
युद्धपातळीवर तपास
खुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांच्या जावयाचीच गाडी चोरीला गेल्याने त्याच्या शोधासाठी पोलीस दल कामाला लागले होते. दहिसर, नवी मुंबई, ऐरोली आणि मुलुंड तसेच थेट तलासरीच्या सीमेवरही नाकाबंदी करण्यात आली होती. गुन्हेशाखेचे पथकसुद्धा या गाडीचा शोध घेत होते. सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या विशेषाधिकाराने ही गाडी श्रॉफ यांना सोमवारी ताब्यात मिळणार आहे. ना. म. जोशी मार्ग पोलीस लीलावती परिसरातील सीसीटीव्ही तपासून अज्ञात वाहनचोराचा शोध घेत आहेत.

Story img Loader