सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सुमारे चार ते सात हजार वर्षांपूर्वीची कातळशिल्पे (रॉक आर्ट) सापडली असून, नवाश्मयुगातील आदिमानवाची ती अभिव्यक्ती असल्याचा अंदाज आहे. मालवण तालुक्यातील कुडोपी येथे एकाच ठिकाणी जवळपास ६० हून अधिक कातळशिल्पे आढळली आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग हा कातळशिल्पांच्या जागतिक नकाशावर आला आहे.
जगाच्या विविध भागांत आदिमानवाने खोदलेली कातळशिल्पे, दगडावर रेखाटलेली रंगचित्रे आढळून येतात. जगात ‘रॉक आर्ट’ म्हणून ती ओळखली जातात. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भीमबेटका येथील गुहेतील रंगचित्रे हा ‘रॉक आर्ट’चाच प्रकार आहे. कर्नाटकातील बदामी येथे ‘रॉक आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या १७व्या राष्ट्रीय परिषदेत सोसायटीचे सदस्य असलेल्या सतीश लळीत यांनी कुडोपी येथील कातळशिल्पांबाबतचा शोधनिबंध सादर केला. त्यात मालवण तालुक्यातील हिवाळे आणि कुडोपी येथील कातळशिल्पांची सविस्तर माहिती छायाचित्रांसह सादर करण्यात आली.
कुडोपी या गावाजवळ डोंगरावरील जांभ्या दगडावर सुमारे ६० कातळशिल्पे आहेत. यात मानवाकृती, मासे, विविध प्रकारची वर्तुळे, पक्षी, चित्र-विचित्र आकृती मोठय़ा प्रमाणात आहेत. एकाच ठिकाणी इतक्या मोठय़ा प्रमाणात कातळशिल्पे आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात मातृदेवतेचे शिल्प विशेष उल्लेखनीय आहे. हिवाळे येथेही अशाच कातळशिल्पांचा शोध दहा वर्षांपूर्वी लागला होता. या कातळशिल्पांचे तज्ज्ञांकडून वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास कोकण किनारपट्टी प्रदेशाच्या प्राचीन इतिहासावर अधिक प्रकाश पडू शकतो, असे मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या लळीत यांचे म्हणणे आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा