काशीमीरा परिसरातील मांडवीपाडा भागात अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाई करण्यास गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांवर भूमाफियांकडून चक्क दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार अशा बांधकामावर दररोज कारवाई केली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत प्रभाग क्रमांक ६ चे प्रभाग अधिकारी चंद्रकांत बोरसे हे महापालिकेचे कर्माचारी, १९ सुरक्षारक्षक आणि १५ पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घोडबंदर येथील मांडवी पाडा परिसरात गेले होते.

यावेळी त्यांनी सर्व्हे क्रमांक ८७/४ येथे गोविंद विश्वकर्मा आणि बबलू पांडे यांनी बांधलेली २० पक्की घरे तोडली. ही घरे तोडल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा सर्व्हे क्रमांक २४/२५ येथील अनधिकृत बांधकामांकडे वळवला. या ठिकाणी ते जेसीबी मशीन घेऊन पोहचताच तेथे असलेल्या गुंडांनी पालिकेचे कर्मचारी, पोलिस आणि जेसीबी यांच्यावर तुफान दगडफेक सुरू केली. कर्मचारी वेळीच तिथून बाजूला झाल्याने बचावले. मात्र, जेसीबीचे नुकसान झाले. यासंदर्भात काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.