बेस्टच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे लांबणीवर पडलेले सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी द्यावे, असा आदेश महापौर सुनील प्रभू यांनी दिला. पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस मिळताच बेस्ट कर्मचारीही सानुग्रह अनुदानाची मागणी करू लागले होते. मात्र बेस्टच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देता येणार नाही, अशी भूमिका महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांनी घेतली होती. त्यामुळे कामगार संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. अखेर महापौर सुनील प्रभू यांनी बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये मध्यस्थी करीत कामगार नेत्यांना आंदोलनापासून परावृत्त केले. तसेच दिवाळीपूर्वी कामगारांना बोनस देण्यासाठी प्रशासनाचे मन वळविले. मात्र डळमळीत आर्थिक स्थितीमुळे अद्याप बेस्ट कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळू शकलेले नाही.
बेस्टची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी नगरसेवकांनी केलेल्या सूचनांचा विचार करावा, तसेच नवे बसमार्ग सुरू करावेत आणि आर्थिक स्थिती मजबूत करावी, असे बेस्टच्या २०१३-१४ च्या अर्थसंकल्पाला मंजुरी देताना महापौरांनी सूचित केले. तसेच होळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिवाळीचे सानुग्रह अनुदान द्या, असे आदेश महापौरांनी दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा