महाराष्ट्र राज्य दिवाळखोरीत निघाले, राज्याची पत घसरली, असले गैरसमज पसरविण्याचे धंदे आता बंद करा, असा सज्जड इशारा सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षांना दिला. राज्याची सत्ता साडेचार वर्षे तुमच्या हातात होती. तुम्ही चांगले काम केले असते तर जनतेने पुन्हा तुम्हाला निवडून दिले नसते का, असा सवाल करीत अजितदादांनी विरोधकांची चांगलीच हजेरी घेतली.
विधान परिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना पवार यांनी, विरोधी पक्षांच्या मुद्यांचा  समाचार घेतला. ‘कसे न तेव्हा कळले नाही, की तो होता आवच सारा, अनुभूतीच्या आधाराविना, पोकळ नुसता शब्द पसारा’, या कवियत्री शांता शेळके यांच्या कवितेच्या ओळी उधृत करुन पवार यांनी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या अर्थसंकल्पावरील भाषणाची खिल्ली उडविली.
काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार चांगले काम करीत आहे म्हणूनच १९९९ पासून तीन वेळा राज्याच्या जनतेने आघाडीच्या हातात सत्ता दिली. गेल्या दहा वर्षांत राज्यातील दरडोई उत्पन्नात व राज्याच्या सकल उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यावरील कर्जाबद्दल कायम चर्चा केली जाते. परंतु राज्याच्या सकल उत्पन्नाच्या २५ टक्क्य़ाच्या आत कर्ज असावे, असा नियम आहे. परंतु राज्यावरील सध्याचे कर्ज हे फक्त १७.६८ टक्के इतके आहे. केंद्र सरकारने २०१३-१४ साठी राज्याची ४८,६०३ कोटी रुपये नवे कर्ज काढण्याची मर्यादा निश्चित करून दिली आहे. हे राज्याची पत घसरल्याचे चिन्ह आहे का, असा सवाल त्यांनी केला.
कठोर निर्णयावर ठाम
अर्थसंकल्पात महसूलवाढीसाठी व बचतीसाठी काही संकल्प करण्यात आलेले आहेत. सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तूंवर लावण्यात येणारा प्रस्तावित कर कोणत्याही परिस्थिीत मागे घेतला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
काही महानगरपालिकांमध्ये जकात रद्द करून स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला कुणी विरोध करु नये. हा निर्णयही कायम राहील, असे त्यांनी सांगितले. खासगी अनुदानित शिक्षण संस्थांना १ एप्रिलपासूनच वेतनेत्तर अनुदान देण्यात येईल, पूर्वीचे मिळणार नाही,असे त्यांनी ठणकावून सांगितले.

Story img Loader