मुंबई – मुंबई, ठाणे, पालघर, रायगड येथे पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने वर्तवली आहे. या वेळी वाऱ्यांचा वेग ताशी ५० ते ६० किमी राहील.
मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघरला सोमवारी वादळी वारे आणि वळीवाच्या सरींनी झोडपून काढले. वेगवान वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. मुंबईत विविध दुर्घटनांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला. वाहतुकीचा खोळंबा झाल्यामुळे अनेकांना तासनसात प्रवासात घालवावा लागला, स्थानकांवर अडकून राहावे लागले. आता पुन्हा एकदा पुढील तीन ते चार तासांसाठी मुंबईत विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाच्या मध्यम सरींचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी काही भागांत वाऱ्यांचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहील. त्याचबरोबर मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे, पालघर हे जिल्हे आणि नवी मुंबईतील मोठ्या भागाचा समावेश असलेल्या रायगड जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या परिसरात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. या जिल्ह्यांत काही भागांत गारा पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा – घाटकोपर होर्डिंगच्या मालकावर बलात्काराचाही गुन्हा; अवैध कृत्यांची मोठी पार्श्वभूमी
याशिवाय बीड, जालना, नागपूर, भंडारा, वर्धा, अमरावती, यवतमाळ, गोंदिया, अकोला, वाशिम या जिल्ह्यांतही वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील काही भागांत गारपीटीचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे.