मुंबईतील प्रभादेवी भागातील उंच इमारतींच्या छतावर एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उडी घेणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरुन पोलिसांनी संबंधीत परदेशी तरुणांना ताब्यात घेतले आणि त्यांना मायदेशी परत पाठवले. मात्र आता पुन्हा एकदा काही परदेशी मुलांनी मुंबईमध्ये येऊन असाच व्हिडीओ शूट केला आहे. मात्र अशाप्रकारची स्टंटबाजी जीवघेणी ठरु शकते.
२४ नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या प्रभादेवी भागातील एलफिन्स्टन रोड इथल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील तेरा मजल्याच्या इमारतीच्या छतावर काही तरुणांनी एका इमारतीवरुन दुसऱ्या इमारतीवर उड्या घेत स्टंटबाजी केली. पुढील काही दिवसांमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला. जीवावर उदार होऊन काळजाचा ठोका चुकवणाऱ्या स्टंटबाजीचा हा व्हिडिओची पोलिसांनी दखल घेत संबंधीत तरुणांना शोधून काढले आणि त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना समज देऊन मायदेशी पाठवण्यात आले. मुळात ही स्टंटबाजी नसून पार्कोर नावाचा एक खेळाचा प्रकार असल्याने या मुलांवर झालेल्या कारवाईबद्दल तरुणांनी नाराजी व्यक्त केली. याच नाराजीचा एक भाग म्हणून परदेशातील ‘स्टॉरर’ या पार्कोर ग्रुपने मुंबईतील प्रभादेवी येथील इमारतींवर रुफ टॉप म्हणजेच छातावर पार्कोर या खेळाची प्रात्यक्षिक दाखवत त्याचा व्हिडीओ शूट करुन तो आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रभादेवी परिसरामधील काही इमरतींच्या गच्चीवरुन ही मुले उड्या मारताना दिसत आहे.
‘स्टॉरर’ या ग्रुपने हा व्हिडीओ शूट करत आम्ही हा व्हिडीओ शूट करुन पुन्हा इंग्लंडमध्ये आलो आहोत. भारतामध्ये काही दिवसापूर्वी एक प्रकरण अगदी चिघळल्याने आम्ही मुंबईत जाऊन हा व्हिडीओ शूट करुन पोस्ट करण्याचे ठरवल्याचे या ग्रुपमधील सदस्यांचे म्हणणे आहे.
नक्की वाचा >> ‘पार्कोर’ म्हणजे काय
मुळात पार्कोर हा खेळ आता अनेक देशांमध्ये औपचारिकरित्या शिकवला जातो. त्याचे क्लासेसही उपलब्ध आहेत. मुंबईतही काही आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये हा खेळ आता शिकवला जातो.