आपल्या सामाजिक, राजकीय भावना इतक्या तीव्र आहेत की आपल्याला परप्रांतीयांचे अतिक्रमण लगेच समजते. त्यावरून आपण दगड उचलून तो भिरकवायलाही तयार असतो. पण पर्यावरणीय भावना संवेदनशील नसल्याने आपल्याला वन्य प्राण्यांच्या हद्दीत झालेले मानवी अतिक्रमण समजत नाही. बिचाऱ्या वन्य प्राण्यांना तर त्यांच्यावर बाहेरून होणाऱ्या अतिक्रमणाबरोबरच अंतर्गत संघर्षांलाही तोंड द्यायचे असते. हा संघर्ष थांबविण्यासाठी वेळ आली आहे ती हद्द आखून घेण्याची!

वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या एका अधिकाऱ्याला आलेला हा अनुभव..

विदर्भाच्या व्याघ्र प्रकल्पांतर्गत एका गावात जनजागृतीपर कार्यशाळा घेण्यात आली होती. मात्र वाघ, बिबटे, त्यांचे प्रकल्प हे काहीतरी भलते प्रकरण असल्यासारखे ‘तुमचे प्राणी आमच्या हद्दीत नकोत,’ असे उपस्थित गावकरी वनाधिकाऱ्यांना खडसावून सांगत होते. सतत ‘तुमचे प्राणी’ असा उल्लेख करणारे हे गावकरी खरेतर स्वत: वन्यजीवांच्या हद्दीत नांदत होते. हीच परिस्थिती मुंबईतही आहे.

मुंबईत लागोपाठ दोन दिवस बिबटय़ांचा मानवी वस्तीत वावर दिसून आला. एका प्रसंगात तर त्याने हल्लाच केला. त्यामुळे प्राणी आणि मानवाच्या हद्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जंगलापासून दूरवर असलेल्या मानवी वस्तीत बिबटय़ाने प्रवेश करण्याच्या घटना वाढल्या आहेत. या आधीही मुलुंडमधील नाणेपाडा, अंधेरीतील शेर-ए-पंजाब वसाहत आणि उल्हासनगरमधील भाटिया चौक अशा जंगलापासून काही किलोमीटर दूर असलेल्या वसाहतींतही बिबटय़ा शिरला होता. मुळात बिबटय़ा गंमत म्हणून मानवी वस्तीत येत नाही, हे लक्षात घ्यायला हवे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानावर गेल्या काही वर्षांत झालेले मानवी अतिक्रमण हेही एक कारण यामागे आहे. मानव-बिबटय़ामधील हा संघर्ष कमी करण्याकरिता आधी या अतिक्रमणावर कारवाई करणे आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा बिबटय़ांच्या बदलणाऱ्या सवयी आणि स्थलांतर यांच्या अभ्यासाचा आहे. सध्या राष्ट्रीय उद्यानात अधिवास करणाऱ्या बिबटय़ांची गणना केली जाते. मात्र हे केवळ बिबटय़ांची संख्या मोजण्यापुरतेच मर्यादित न राहता त्यांच्या बदलणाऱ्या सवयी, गजबजलेल्या मानवी वसाहतीपर्यंत होणारे स्थलांतर, त्यामागील कारणे यांचाही अभ्यास होणे गरजेचे आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंधेरीतील शेर-ए-पंजाब या वसाहतीमधील लहान मुलांच्या शाळेत बिबटय़ाचे दोन वर्षांचे मादी पिल्लू आढळून आले होते. सुमारे दहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश मिळाले. साधारण दोन वर्षांनंतर बिबटय़ाचे पिल्लू स्वत:ची हद्द बनविण्यासाठी आईपासून वेगळे होते. थोडक्यात ते पिल्लू हद्दीच्या शोधात तिथे भरकटलेल्या अवस्थेत आले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडय़ातील बैठय़ा वस्तीमध्ये एक प्रौढ नर बिबटय़ा घुसला. लपतछपत बिबटय़ाने येथील काही रहिवाशांवर हल्लाही केला होता. राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीपासून सुमारे सात ते आठ किलोमीटर दूरवर असलेल्या या परिसरात बिबटय़ा कसा आला आणि त्याने माणसांना लक्ष्य का केले? याबाबत वन्यजीव संशोधकही आश्चर्य व्यक्त करत आहेत. मार्च महिन्यात उल्हासनगरमध्ये घडलेली घटनाही याच प्रकारातली. येथील भाटिया चौकातील एका बंगल्यात बिबटय़ा अडकला होता. हा संपूर्ण परिसरदेखील गजबजलेला आणि हरितक्षेत्रापासून दूर असल्याने बिबटय़ा येथे कसा आला, असा प्रश्न आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या या तीनही घटनांवरून बिबटय़ा आपल्या मूळ अधिवासापासून कित्येक किलोमीटर प्रवास करून त्याला परिचित नसलेल्या मानवी वसाहतींजवळ येत असल्याचे दिसत आहे.

या वर्तनामागे अनेक कारणे असू शकतात. एक म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिक्षेत्रातील बिबटय़ांची संख्या वाढत आहे का? त्यामुळे त्यांच्यात अधिवासाचा प्रश्न निर्माण होत आहे का? की बिबटय़ांच्या अधिवासाच्या सवयी बदलत आहेत? थोडक्यात त्यांच्या वर्तनातील बदल आणि त्यांचे होणारे स्थलांतर यांचादेखील अभ्यास होण्याची नितांत गरज आहे. येत्या वर्षभरात बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावून त्यांनी मानवाशी जुळवून घेतलेल्या अधिवासाचा आणि स्थलांतरणाचा अभ्यास राष्ट्रीय उद्यान प्रशासनातर्फे हाती घेण्यात आला आहे. अर्थात असा अभ्यास एकदाच करून भागणार नाही. वारंवार करावा लागेल.

मुळात बिबटय़ा हा प्राणी लाजाळू असून मानवापासून चार हात लांब राहणारा आहे. वाघांप्रमाणेच तोही स्वत:ची हद्द ठरवतो आणि इतरांच्या हद्दीत शिरकाव करत नाही. मात्र मुंबईतील राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ांच्या या सवयींना छेद देणाऱ्या घटनांची नोंद वन्यजीव संशोधकांनी केली आहे. एकीकडे येथील बिबटय़ांची संख्या वाढते आहे तर दुसरीकडे उद्यानाच्या चहुबाजूने झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचे क्षेत्र घटते आहे. थोडक्यात हा संघर्ष एकाच वेळी आतल्यांशी आणि बाहेरच्यांशी आहे. वन्यजीव आणि हरितपट्टय़ांच्या संरक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या उद्यानाभोवतीचा ‘बफर’ झोन काही भागांमध्ये अतिक्रमणामुळे संपुष्टात आला असल्याने प्रत्येक बिबटय़ाची हद्द आक्रसते आहे. आता तर काही ठिकाणी एका परिक्षेत्रामध्ये दोन बिबटे नांदत असल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.

राहुलनगर परिसरामधील रहिवाशांना बिबटय़ाचे दर्शन नवे नाही. मात्र हल्ला झालेल्या तरुणाचे घर इथल्या खालच्या वस्तीत, जिथे बिबटय़ाचा फारसा वावर नाही तिथे आहे. थोडक्यात बिबटय़ाला हा परिसर नवीन नाही. परंतु या घटनेच्या निमित्ताने उद्यानाच्या हद्दीला लागून असलेल्या भांडुपच्या खिंडीपाडय़ापासून ठाण्यापर्यंतच्या परिसरात वाढलेल्या अनधिकृत वस्तींचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. परंतु असे काही झाले की वनविभागाकडून काही दिवसांसाठी गस्त घालून किंवा कॅमेरा लावून वरवरची मलमपट्टी करण्यापलीकडे काही होत नाही. बिबटय़ा कुत्री, शेळी-मेंढी अशा सहज खाद्याच्या शोधाकरिता मानवी वसाहतीमध्ये शिरतो असे कारण प्रत्येक वेळेस देऊन या प्रश्नाचा वास्तववादी आणि शास्त्रीय कारणांचा शोध घेण्याचे टाळले जाते. ही उदासीनता जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत हा आतला आणि बाहेरचा संघर्ष सुरूच राहणार!

Story img Loader