मुंबई: निसर्गाचे स्वरूप आणि परिसंस्था यापासून प्रेरणा घेत शाश्वत रचना आकारण्याच्या ध्यासातून कार्बन कचऱ्यापासून फरशी तयार करण्याचा अनोखा प्रयोग तेजस सिदनलने केला आहे. मुंबईच्या या ध्येयवेडय़ा तरुणाच्या प्रवासाची कथा नॅशनल जिओग्राफीच्या माध्यमातून आता जगभरात पोहचणार आहे.
मुंबई विद्यापीठातून वास्तुविशारद क्षेत्रात पदवीचे शिक्षण पूर्ण करताना तेजसला ‘बायोमिमिक्री’ या विषयाने झपाटून सोडले. बायोमिमिक्री म्हणजे निर्सगाच्या परिसंस्थेचे अनुकरण करत शाश्वत रचना साकारणे. बायोमिमिक्रीचा सखोल अभ्यास करून ती कशी साकारता येईल हे समजून घेण्यासाठी त्याने परदेशातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. कार्बन शरीरासाठी अत्यंत घातक असून याची विल्हेवाट लावण्यासाठी शाश्वत पर्याय असू शकेल का याचा विचार तेजसच्या डोक्यात घोळत होता. अनेक पर्यायांवर काम केल्यावर अखेर तेजसने कार्बन कचऱ्याच्या वापरापासून फरशांची यशस्वीपणे निर्मिती केली. केवळ संशोधन पुरेसे नसून त्याचा प्रत्यक्षात वापर होणेही आवश्यक आहे हे ओळखून तेजसने २०१६ साली ‘कार्बन क्राफ्ट’ ही स्टार्टअप कंपनीही सुरू केली.
सहा वर्षांच्या प्रवासामध्ये कार्बन फरशांच्या निर्मितीपासून ते विपणनापर्यंत अनेक टप्प्यांवर या कंपनीने यशस्वी वाटचाल केली आहे. भारतभरात मुंबईसह दिल्ली, बंगलोर, चेन्नई इत्यादी शहरांमध्ये या फरशा बसविण्याचे जवळपास दहाहून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. मुंबईत वांद्रे-कुर्ला संकुलातील आदिदासच्या दुकानातही कार्बनच्या फरशा बसविण्यात आल्या आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या फरशांच्या तुलनेत या फरशा तयार करण्यासाठी एक पंचमाश ऊर्जा वापरली जाते. तसेच या फरशांचा वापर केल्यास ५६ किलोग्रॅम कार्बनची विल्हेवाट शाश्वतरित्या लावली जाते. या फरशा हाताने घडविल्या जात असून याच्यावर नक्षीकाम करण्यासाठी गुजरातमधील कलाकारांना सहभागी केले आहे.
हाताने घडविल्यामुळे यांची किंमत बाजारातील फरशांच्या तुलनेत सध्या जास्त आहे. परंतु याची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढल्यास किंमतही हळूहळू कमी होईल. बाजारात असा पर्याय लोकांसाठी उपलब्ध करून देणे आणि तो त्यांच्यापर्यत पोहचविणे हेच आमचे उद्दिष्टय़ आहे, असे तेजसने सांगितले. सध्या या फरशा घरामध्ये किंवा बंद वातावरणात वापरण्यास योग्य आहेत. बाहेरील वातावरणामध्येही याचा वापर कसा करता येईल यासाठीचे संशोधनही पुढच्या टप्प्यात केले जाणार आहे, असेही तेजसने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३० व्यक्तींचा प्रवास
नॅशनल जिओग्राफीने तेजससह ३० व्यक्तींचा प्रवास उलगडत बदलाची सुरुवात स्वत:पासून कशी करता येईल याचे प्रोत्साहन प्रेक्षकांना देण्यासाठी ही मोहीम सुरू केली असल्याचे मत डिस्ने स्टारचे प्रमुख केविन वाझ यांनी यावेळी व्यक्त केले. गांडुळ खताचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या बंगलोरच्या वाणी मूर्ती, हर्गिला या पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी महिलांचा चमू कायर्रत करणाऱ्या आसामच्या डॉ. पूर्णिमा देवी बर्मन, समुद्रातील प्रवाळ पुनस्र्थापनेसाठी प्रयत्नशील असणारे गोव्याचे वेंकटेश चार्लू, कृषीच्या कचऱ्यापासून शेतकऱ्यांसाठी उपयुक्त साधनांची निर्मिती करणारा दिल्लीचा विद्युत मोहन, पर्यावरण संवर्धानाबाबत जनजागृती करणाऱ्या मध्य प्रदेशच्या वर्षां राईकवार, खेडय़ामध्ये सौरउर्जा निर्मितीची कंपनी उभारून महिलांना संघटित करणाऱ्या राजस्थानच्या रुक्मिणी कटारा यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमींचा प्रवास या मोहिमेतून जगभरात पोहचविला जाणार आहे.
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने २२ एप्रिल रोजी नॅशनल जिओग्राफिकने ‘वन फॉर चेंज’ ही मोहीम सुरू केली आहे. पर्यावरण संवर्धनासाठी एका व्यक्तींच्या माध्यमातूनही बदल घडविता येतो हा संदेश देत सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये साध्या कृतीमधून पर्यावरण जतनाच्या दिशेने बदल घडवू पाहणाऱ्या भारतभरातील दहा पर्यावरणप्रेमींच्या कामाचा आढाव घेणारी लघुपटांची मालिका २२ एप्रिलपासून या वाहिनीवर प्रसारित केली जाणार आहे. या मोहिमेची घोषणा अभिनेत्री दिया मिर्झाने मंगळवारी जुहू येथे केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story carbon flooring world stage tejas mumbai selected national geographic campaign amy
Show comments