‘मृत्यू’इतकी नकारात्मक भावना जागवणारी दुसरी घटना ती कोणती? त्यातून ती व्यक्ती आपल्यापैकीच एक असेल तर? उत्तराखंडातील निसर्गाच्या प्रलयामुळे बद्रीनाथमध्ये गेले दहा दिवस अडकून पडलेले महाराष्ट्रातील १०४ ज्येष्ठ नागरिक सध्या याच नकारात्मक भावनेच्या फेऱ्यात अडकले आहेत.
धो धो कोसळणारा पाऊस, हाडे गोठवणारी थंडी, वृद्धापकाळाने थकलेले शरीर, त्यात मधुमेह, हाडांचे दुखणे, उच्च रक्तदाबाचे विकार आणि संपत चाललेली औषधे यामुळे हे भाविक खचून गेले आहेत. त्यांच्या एक सहकारी गुलाब दोशी (६३) यांचा थंडीने कुडकुडून डोळ्यांदेखत मृत्यू झाल्याने विचित्र सन्नाटा या साऱ्यांच्या मनावर पसरला आहे. ‘मोहनलाल मेहता चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून हे सर्व भाविक ३ जूनला मुंबईहून चारधाम यात्रेसाठी निघाले होते. यात्रा संपवून हा गट १५ जूनला बद्रीनाथहून हरिद्वाराला यायला निघाला. मात्र, निसर्गाच्या प्रकोपामुळे त्यांना परतीचा प्रवास स्थगित करत पुन्हा मागे येऊन बद्रीनाथमधील ‘परमार्थ लोकाश्रमा’त आसरा घ्यावा लागला. तेव्हापासून हे भाविक अडकून पडले आहेत.
रोज सकाळी उठून हे यात्रेकरू हेलिपॅडभोवती रांगा लावून उभे राहतात. पण, सुटकेसाठी जमलेल्या पर्यटकांचा त्या ठिकाणी इतका गोंधळ होतो की दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून मदतीसाठी आलेले हेलिकॉप्टर स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांना परत पाठवावे लागले. ६२ वर्षांचे मोहन मेहता यांनी त्यांचे पुतणे डॉ. विजय गांधी यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली.
‘माझे काका ज्या ठिकाणी अडकून पडले आहेत तेथे दिवसभरात केवळ तासभर वीज असते. या वेळेत जितका वेळ सेलफोन चार्ज करता येईल तितका करून घ्यावा लागतो. सेलफोन चालत नसल्याने त्यांच्याशी सारखा संपर्कही साधता येत नाही,’ असे गांधी यांनी सांगितले. अडचणी ऐकून मुंबईतले नातेवाईक घाबरून जातील म्हणून ते आमच्याशी फारसा संपर्कही साधत नाहीत, असे ते म्हणाले.
या पथकातील बहुतेकांजवळची औषधे संपत आल्याने मुंबईतील या नातेवाईकांनी देहरादूनहून औषधे पाठविण्याचा प्रयत्न केला. पण, तो सफल झाला नाही. ‘त्यातल्या त्यात ज्या आश्रमात ते थांबले आहेत त्या ठिकाणी अन्न आणि निवाऱ्याची सोय आहे. औषधे संपल्यावर मात्र अवस्था बिकट होईल,’ अशी भीती आशीष मेहता यांनी व्यक्त केली.

टोकन मिळाले, पण..
बद्रीनाथमध्ये अडकून पडलेल्या या यात्रेकरूंना सुटकेसाठी टोकन दिले जात आहे. तसे टोकन मंगळवारी सकाळी या भाविकांना मिळाले. मात्र, यानंतर आपली सुटका कधी होणार याबाबत काहीच निश्चितता नसल्याने हे भाविक अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.

Story img Loader