फिरण्याची आवड कोणाला नसते. मुळात फिरण्याची आवड असली तरी त्यासाठी लागणारी सवड मिळत नसल्यामुळेच अनेकांचे कितीतरी बेत फक्त कागदोपत्री किंवा मग व्हॉट्स अॅप ग्रुपपुरतेच सिमीत राहतात. पण, याला काही व्यक्ती अपवादही ठरतात. असंच अपवाद ठरलेलं एक नाव म्हणजे देबाशिष घोष. मुंबईकर निखिल या व्लॉगरच्या व्लॉगमध्ये सतत दिसणारा एक चेहरा किंवा मग एक बाईक वेडा अवलिया, अशी त्याची ओळख. बाईकप्रेमी, युट्यूबर्स आणि भटकंतीचं वेड असणाऱ्यांसाठी देबाशिष हे ओळखीचं नाव.

त्याच्याकडे असणाऱ्या हार्ली डेव्हिडसन आणि बीएमडब्ल्यू हा तरुण रायडर्समधील एक महत्त्वाचा विषय. अशा या देबाशिषने नुकतीच बाईकवरुन त्याची विश्वभ्रमंती पूर्ण केली असून, काही दिवसांपूर्वीच तो भारतात परतला. २७० दिवसांच्या या प्रवासात देबाशिषने ३५ देश आणि पाच खंडांमधून प्रवास केला. त्याने या प्रवासात जवळपास ६८ हजार किमी इतकं अंतर पार केलं.

आपला इंदौरचा मित्र धर्मेंद्र जैन याच्या साथीने देबाशिषने हा प्रवास पूर्ण केला. खुद्द पंतप्रधानांच्या शुभेच्छा घेत सुरु झालेल्या या प्रवासामुळे देबाशिष आणि त्याचा मित्र सध्या बराच चर्चेत आला आहे. अडचणी, हवामानात होणारे बदल या साऱ्याचा सामना करत या दोन्ही मित्रांनी मैलोंचं अंतर पार केलं. आपल्या या प्रवासातील काही क्षणांविषयी सांगताना देबाशिष म्हणाला, ‘प्रत्येक देशातील नागरिकांनी आमचं मोठ्या आपुलकीने स्वागत केलं. काही देशातील सैनिकांनीसुद्धा आमच्याशी मोठ्या कुतूहलाने गप्पा मारल्या. मुळात सैनिकांमध्ये असणारं हे कुतूहल आणि आम्ही काहीतरी भन्नाट गोष्ट करत असल्याचा त्यांना वाटणारा अभिमान पाहता ही गोष्ट आमच्यासाठी फार महत्त्वाची होती.’ सीमा किंवा मर्यादा या माणसांनीच आखलेल्या असतात आणि त्याच सीमांचं उल्लंघन करणाऱ्या देबाशिषचा हा भन्नाट अनुभव त्याने ‘लोकसत्ता ऑनलाईन’शी संवाद साधत शेअर केला. चला तर मग, पाहूया प्रवासवेड्या मित्राची अनोखी विश्वभ्रमंती…

https://www.instagram.com/p/BgtpvopAQgU/