रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयात बाळंतपणासाठी दाखल झालेल्या मालतीला अत्यंत दुर्मिळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रक्ताची गरज असल्याचा निरोप विक्रम यादवला सायंकाळी सात वाजता तासगावमध्ये मिळाला. रक्त मिळाले नाही तर मालती व बाळ वाचणे कठीण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. विक्रमने तात्काळ मोटरबाईकला किक मारून पहाटे तीन वाजता रत्नागिरीला पोहोचून रक्तदान केले. पहाटे सहा वाजता एका गोजिरवाण्या बाळाला मालतीने जन्म दिला, आणि केवळ विक्रमच्याच नव्हे तर डॉक्टरांच्याही चेहऱ्यावर समाधान आणि आनंद उमटला.

बाळंतपणासाठी दाखल झालेल्या मालतीचा रक्तगट हा ‘बॉम्बे ब्लड’ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले तेव्हा धोका त्यांना जाणवला. बाळंतपणासाठी सिझेरियन करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यातच तिचे हिमोग्लोबिन अतिशय कमी होते.आता बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्त शोधायचे कोठून हा प्रश्न निर्माण झाला. वॉट्सअ‍ॅप, मेसेजसह सर्व यंत्रणांच्या माध्यमातून या रक्तगटाचे रक्तदाता शोधण्याचे काम सुरु झाले. संपूर्ण देशात या रक्तगटाचे १६९ रक्तदाते असल्याने आता काय होणार हा प्रश्न सर्वापुढे निर्माण झाला होता. यागायोगाने तासगाव येथील विक्रम यादव या ३९ वर्षांच्या तरुणाच्या पाहण्यात हा मेसेज आला आणि क्षणाचाही विचार न करता त्याने रात्र आठच्या सुमारास मोटरबाईकवरून थेट तासगावहून रत्नागिरीचे शासकीय रुग्णालय गाठले. आपला रक्तगट ‘बॉम्बे’ असल्याचे सांगून त्याने तात्काळ रक्तदान केले. अवघे सहा हिमोग्लोबिन असलेल्या मालतीला तात्काळ रक्त चढवण्यात आले व मालती सुखरूप बाळंत झाली.

काही दिवसांपूर्वीची ही घटना असली तरी विक्रमच्या लेखी ती केवळ एक कर्तव्यभावना आहे. एका संस्थेत वाहनचालकाचे काम करत असलेल्या विक्रांतला १९९४ साली आपला रक्तगट हा ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ असल्याचे व तो दुर्मिळ असल्याचे समजले तेव्हापासून तो सातत्याने गरजू रुग्णांना रक्तदान करत आहे. आजपर्यंत आपण ४४ वेळा रक्तदान केले असून आपले रक्त फ्रान्स, कोलंबियापासून ते भारतात गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंतच्या अनेक रुग्णांना देण्यात आल्याचे त्याने सांगितले.

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे विक्रांत मानतो. यातून त्याने ‘बॉम्बे ब्लड ग्रुप संस्था’ स्थापन केली असून त्यात १५,७३० रक्तदात्यांची नोंद आहे. एखाद्या गरजू रुग्णाकडे उपचारासाठी पैसे नसल्याचे विक्रांत कळल्यास तो सर्व माहिती घेऊन संस्थेच्या सदस्यांकडून दहा रुपये प्रत्येकी याप्रमाणे एक लाख ५७ हजार ३०० रुपये गोळा करून त्यातून रुग्णाला आर्थिक मदतही करतो. रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.आर.अरसुळकर यांनी त्याचा सत्कारही केला.

देशात केवळ ३०० जण

संपूर्ण देशात या रक्तगटाचे सुमारे ३०० लोक असून महाराष्ट्रात सुमारे सव्वाशे लोक आहेत. या रक्तगटाच्या रक्तदात्यांची राज्यात संख्या ५५ एवढी असून देशात सुमारे १६९ रक्तदात्यांची नोंद असल्याचे थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी सांगितले. केईएम रुग्णालयातील डॉ. वाय. एम. भेंडे, डॉ. सी. के. देशपांडे व डॉ. एच. एम. भाटिया यांनी हा दुर्मिळ रक्तगट शोधून काढला. लॅन्सेट या मासिकात याची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर या रक्तगटाला (एबीओ एच अ‍ॅन्टिजेन नसलेला) ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ म्हणून ओळखले जाऊ लागले.