संदीप आचार्य
‘कारतूस साब’ ही सत्यकथा आहे, इयान कार्डोझो या मुंबईकर महत्त्वाकांक्षी युवकाची! जो आता अवघा ८५ वर्षांचा आहे. भारतीय लष्करात अधिकारी पदावरील तीन दशकांच्या आपल्या कारकीर्दीत तीन युद्धांत अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्या मेजर जनरल (निवृत्त) इयान यांच्या दुर्दम्य साहसाची ही अशक्यप्राय कहाणी आहे. बांगलादेशाच्या लढाईत पाय गमावूनही, इयान यांनी उमेद कायम राखीत अपंगत्वानंतरही भारतीय लष्करात आपल्या बटालियन आणि ब्रिगेडचे नेतृत्व इयान कसे केले, याची ही चित्तथरारक कथा आहे.
येत्या रविवारी, १३ नोव्हेंबर रोजी वांद्रे येथील सेंट पॉल्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स अँड एज्युकेशन संस्थेत संध्याकाळी पाच वाजता आयोजित एका कार्यक्रमात मेजर जनरल (निवृत्त) इयान कार्डोझो लिखित ‘कारतूस साब: अ स्टोरी ऑफ रेझिलियन्स इन अॅडव्हर्सिटी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळेस इयान यांना भेटण्याची आणि पुस्तकावर त्यांची स्वाक्षरी घेण्याची संधी उपस्थितांना मिळेल. पुस्तक प्रकाशनाचा हा कार्यक्रम टाटा प्रायोजित मुंबई लिटरेचर फेस्टिव्हलचा एक भाग आहे.
लष्करातील तीन दशकांहून अधिक काळाचा त्यांचा हा प्रवास आणि तीन युद्धांचे त्यांचे स्वतःचे अनुभव या पुस्तकात व्यक्त केले असले तरी, त्यांची ही कहाणी त्या आव्हानात्मक काळात जबाबदारी निभावणाऱ्या भारतीय सैन्यातील इतर अनेक अधिकाऱ्यांची असू शकते, इतकी ती प्रातिनिधिक आहे.
७ ऑगस्ट १९३७ रोजी मुंबईत जन्मलेल्या इयान कार्डोझो यांचे शिक्षण धोबी तलाव येथील प्रतिष्ठित सेंट झेवियर्स स्कूल आणि झेवियर्स महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात दाखल झाल्यानंतर वर्षभरानंतरच इयान जुलै १९५४ मध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये सामील झाले, जिथे त्यांनी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कॅडेट म्हणून सुवर्णपदक संपादन केले.
इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये दाखल झाल्यानंतर ते पाचव्या गोरखा रायफल्सच्या (फ्रंटियर फोर्स) पहिल्या बटालियनमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या बटालियनसह नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सीमध्ये (एनइएफए) गेले. तिथे सेनेचा पुरस्कार संपादन करणारे ते भारतीय सैन्यातील पहिले अधिकारी होते. १९५९ साली भारत-चीन सीमेवरील गस्तीसंदर्भात त्यांना शौर्य पदक प्राप्त झाले.
इयान १९६२ च्या चीन-भारत युद्धात सहभागी झाले आणि त्या युद्धानंतर त्यांच्या रेजिमेंटच्या चौथ्या बटालियनला पुन्हा उभारी देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. ते १९६५च्या आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात लढले. बांगलादेशातील सिल्हेट येथील १९७१ च्या युद्धात लढताना त्यांना अपंगत्व आले. त्यांनी आपला एक पाय गमावला खरा, पण त्यांची उमेद मात्र बुलंद राहिली. अपंगत्वावर मात करणाऱ्या इयान यांच्या अतुलनीय कर्तृत्वाची दखल घेत, लष्कराच्या मुख्यालयाने त्यांना युद्धात अपंगत्व येऊनही सैन्याच्या बटालियनचे आणि ब्रिगेडचे नेतृत्व करण्याची संधी प्रदान केली. अशा तऱ्हेने पाय गमावूनही बटालियन आणि ब्रिगेडचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेले मेजर जनरल (निवृत्त) कार्डोझो हे पहिले सैन्याधिकारी होते. त्यानंतर त्यांनी नियंत्रण रेषेवर इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले आणि पूर्वेकडील एका कॉर्प्सचे प्रमुखपद भूषवून ते सेवानिवृत्त झाले.
निवृत्तीनंतर ते अपंग व्यक्तींकरता काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेत कार्यरत होते. केंद्र सरकारने त्यांची भारतीय पुनर्वसन परिषदेचे प्रमुख म्हणून त्यांची निवड केली होती.
मेजर जनरल (निवृत्त) कार्डोझोच्या आठवणी त्यांच्यासारख्याच विलक्षण आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘कारतूस साब’ या पुस्तकात एका विलक्षण माणसाच्या विलक्षण प्रवासाचा इतिहास आहे. कारतूस साब ही गोष्ट आहे धैर्याची आणि बांधिलकीची! सैनिकांना सामोरे जाणाऱ्या असंख्य वळणवाटा तुडवीत इयान आयुष्यातील अशक्य प्रसंगांना कसे निधड्या छातीने सामोरे जातात हे जाणून घेताना आपण थक्क व्हायला होते. धैर्य, प्रयत्न आणि दृढनिश्चयातून कधीच हार न मानण्याची भावना कशी बळकट होत जाते, हा संदेशच जणू या पुस्तकातून इयान कार्डोझो यांनी वाचकापर्यंत पोहोचवला आहे.
या अनोख्या पुस्तकाचे स्वागत अनेक माजी सैन्याधिकाऱ्यांनी केले आहे. माजी लष्कराधिकारी, लष्करी इतिहासकार आणि टीव्ही वाहिनीवरील समालोचक मारूफ रझा यांनी म्हटले आहे की, ‘मेजर जनरल (निवृत्त) इयान कार्डोझो हे अशा दुर्मिळ प्रजातीचे आहेत, ज्यांनी सुवर्णपदक छातीवर टाचून अकादमीतून कूच केले, ते गणवेशातील विद्वान म्हणून नव्हे, तर अशक्यप्राय धाडस दाखवीत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी! त्यांच्या आयुष्याचे आणि त्या काळाचे वर्णन आपल्याला कथन करते, की आपण सर्वांनी हे पुस्तक का वाचायला हवे, विशेषत: ज्यांना हे समजून घ्यायचे आहे की, असे काय असते, ज्यामुळे सैनिक कर्तव्याच्या पलीकडे पोहोचत अतुलनीय कामगिरी बजावतात.’
अभिनेता अक्षय कुमार याचा ‘गोरखा’ हा चित्रपट मेजर जनरल (निवृत्त) इयान कार्डोझो यांनी युद्धात बजावलेल्या अतुलनीय कामगिरीवर बेतलेला होता.