प्रत्येकाचं आपापलं असं एक जग असतं. स्वतभोवती फिरणारं. बाहेरच्या जगातल्या समस्या, दुखं आणि वेदना त्या जगाच्या आसपासदेखील नसतात. अचानक काही तरी घडतं आणि बाहेरचं जग आपल्या जगात मिसळून जातं. सगळं काही सुरक्षित, छान असल्याची समजूतही धुरकट होऊ लागते. अशा वेळी मन अस्वस्थ होतं. आपल्या जगातच आपण रमून राहिलो, याचा पश्चात्तापही होतो आणि बाहेरच्या जगाशी मिसळण्याची धडपड सुरू होते. सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला येथील ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’च्या जन्माची कहाणीही काहीशी अशीच!..
पुण्याच्या संजीवनी केळकर लग्न होऊन सांगोल्यात आल्या आणि ग्रामीण भागाशी त्यांची ओळख होत गेली. तालुक्यातल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर.. तोवर पुरुष डॉक्टरांशी बोलण्याच्या संकोचातून तालुक्यातील महिला आपली दुखणी तशीच, अंगावरच झेलत कुढत होत्या, हे त्यांच्या लक्षात आले आणि डॉक्टरकी करतानाच, महिलांच्या भावविश्वाशीही नाते जुळत गेले. या महिला कुठेतरी कुढतायत, कसल्या तरी बंधनात अडकल्यात, हे जाणवत गेलं आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही जाणीव छळत राहिली.. ‘पाठीवर हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा’.. या कुसुमाग्रजांच्या ओळी सतत मनात घुमत राहिल्या, आणि एकमेकींची ओळख पटलेल्या मत्रिणींशी विचारविनिमय सुरू झाला. त्यांनाही कामाचे महत्त्व पटले, आणि एका विचाराने झपाटलेले हात एकत्र आले. अनेक महिला एकत्र आल्या आणि १९७९ मध्ये एका कामाला सुरुवात झाली. ‘माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ या नावाने रुजविलेले ते रोपटे जोपासण्यासाठी, महिला असूनही, न भांडता एकदिलाने ‘मिळून साऱ्या जणी’ कामाला लागल्या आणि सोलापूर जिल्ह्यातील कायमच्या दुष्काळाने ग्रासलेल्या सांगोला तालुक्यात एक काम उभे राहिले. माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान नावाच्या या संस्थेला आता जवळपास ४० वर्षे झाली आहेत.
स्थानिक आमदार गणपतराव देशामुख यांच्या प्रतिमेच्या पुण्याईचे पाठबळ लाभलेल्या या संस्थेचे आता एका विशाल कार्यवृक्षात रूपांतर झाले आहे. महिला बचत गटांपासून आरोग्य, शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, कलोपासना आणि अभिव्यक्ती असे अनेक उपक्रम संस्थेत सुरू झाले आहेत. स्त्री शिक्षण, स्वयंरोजगार, बालकांचा व्यक्तिमत्त्व विकास, संगणक शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा, मदानी खेळ, विक्री केंद्रे, शेती क्षेत्रातील वेगवेगळे प्रयोग, जलसंधारणाची कामे, यातून तालुक्याचे समाजजीवन बदलू लागले आहे. सततच्या समस्यांमुळे कधीकाळी हतबल असलेल्या अनेक कुटुंबांच्या मनाला नवी उभारी येऊ लागली आहे. माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठानने ही किमया केली आहे..