२९ पैकी १२ शाखा बंद, तरी १७ नव्या शाखांचा घाट
मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या शहर आणि उपनगरातील २९ पैकी १२ शाखा बंद पडलेल्या असताना आणि ६ शाखा बंद पडण्याच्या मार्गावर असतानाही मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने आणखी २२ शाखा सुरू करण्याचे ठरवले आहे. यापैकी १७ शाखांना मान्यताही मिळाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.
या सर्व ग्रंथालयांची मालकी बृहन्मुंबई महापालिकेकडे आहे. महापालिकेकडून ग्रंथसंग्रहालयाच्या या सर्व शाखांना वार्षिक अनुदान देण्यात येते. मात्र कधी सभासद संख्या कमी झाल्याचे कारण सांगत तर कधी वेगळ्या ‘अर्था’ने यापैकी काही शाखा बंद पडल्या आहेत. दादर (पश्चिम) शाखा काही वर्षांपूर्वी बंद झाली होती. तोच प्रकार ताडदेव शाखेच्या बाबतीतही झाला. ‘लोकसत्ता’ने वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरच या शाखा सुरू झाल्या.
या पाश्र्वभूमीवर आहेत त्या शाखा व्यवस्थितपणे कशा चालतील, तेथील सभासदांची संख्या कशी वाढेल, याची खबरदारी घेणे आवश्यक असताना आणखी नव्या २२ शाखा सुरू करण्याचा घाट कशासाठी आणि कोणासाठी, असा सवाल केला जात आहे.
नवीन शाखा सुरू करण्याबाबत अंतिम निर्णय अद्याप नाही -कृष्णकांत शिंदे
दरम्यान, या संदर्भात ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह कृष्णकांत शिंदे यांनी नवीन १७ शाखा सुरू करणार असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले. महापालिकेने ग्रंथसंग्रहालयाला ‘आम्ही तुम्हाला जागा देतो, तुम्ही नवीन शाखा सुरू करा’, असे प्रस्ताव असल्याचे सांगून ते म्हणाले की, या सर्व जागा खासगी निवासी संकुलात तसेच काही खासगी मालकीच्या आहेत. त्याचे भाडे व देखभाल खर्च करणे सध्या तरी आम्हाला शक्य नाही. त्यामुळे हा सर्व खर्च महापालिकेने करावा किंवा या बाबतची वेगळी काही सोय करावी, अशी सूचना आम्ही महापालिकेला केली आहे.
ग्रंथसंग्रहालयाच्या शाखा बंद पडल्याचा बातमीत काहीही तथ्य नाही. बंद पडलेल्या शाखांपैकी अनेक शाखा पुन्हा सुरू झाल्या असून सध्या फक्त ३ शाखा बंद आहेत. मात्र त्याही लवकरच सुरू करण्याचा प्रयत्न आहे. ज्या नवीन शाखा आम्ही सुरू होत आहेत त्या बहुतांश उपनगरात आहेत. उपनगरातील वाचकांच्या सोयीसाठी त्या सुरू करत असल्याचा दावाही शिंदे यांनी केला.
ा ग्रंथालयाच्या बंद पडलेल्या शाखा
दादर (अहमद सेलर इमारत), शिवडी, आग्रीपाडा, बेलासीस रस्ता, नवी वाडी (गिरगाव), करीरोड, मांडवी, अभ्युदय नगर, वरळी-कोळीवाडा, बर्वेनगर-घाटकोपर, जिजामाता उद्यान, सेनापती बापट मार्ग
ा बंद पडण्याच्या मार्गावर असलेल्या शाखा
नळबाजार, डोंगरी, वडाळा, लोअरपरळ, बोराबाजार, गोखले मार्ग, दादर