राज्यात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढत असून त्यावर उपाययोजना करण्याबाबत दोनच दिवसांपूर्वी विधानसभेत चर्चा झाली असताना, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांची मोठी दहशत असून लहान मुलीचेही लचके तोडल्याची घटनाही नुकतीच घडली आहे. गोरेगाव येथील नागरी निवारा प्रकल्प परिसरातही कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. जानकर हे रात्री त्या परिसरात असताना एका व्यक्तीच्या अंगावर भटकी कुत्री भुंकत होती. त्याला सोडविण्यासाठी जानकर यांनी कुत्र्यांना दगड मारल्याने कुत्र्यांनी जानकर यांच्याकडे मोर्चा वळवून चावा घेतला. त्यामुळे त्यांना कांदिवली येथे रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
कुत्र्यांना मारण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. प्राणीमित्र संघटनाही त्याविरोधात आहेत. त्यामुळे कुत्र्यांवर निर्बीजीकरणाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. पण त्यात गैरव्यवहार व गैरव्यवस्थापन असून शस्त्रक्रिया होत असल्याचे कागदोपत्री दाखविले जात असले, तरी रस्त्यांवरील भटकी कुत्री वाढतच आहेत. त्याबद्दल विधानसभेतही नुकतीच चर्चा झाली. कुत्र्यांच्या संख्येला आवर घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली, तरी सरकारने त्यादृष्टीने काहीच केलेले नाही. आता आमदारांचाच कुत्र्यांनी चावा घेतल्याने सरकार गंभीरपणे विचार करून पावले टाकणार का, असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा