लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : कांदिवली परिसरातील काही स्थानिक रहिवाशांनी तेथील भटक्या श्वानांची आरे जंगलात बेकायदेशीरपणे रवानगी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकारामुळे प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला असून याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईतील प्राणीप्रेमींनी जंगलात सोडलेल्या श्वानांसाठी शोधमोहीम राबवली आहे. या मोहीमेदरम्यान आतापर्यंत नऊ श्वान सापडल्याचे सूत्रांनी सांगितले.
कांदिवली पूर्व येथील एका गृहसंकुलातील काही रहिवाशांनी श्वानांच्या वाढत्या त्रासाला कंटाळून कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता तब्बल २० श्वानांना पकडून थेट आरेच्या जंगलात नेऊन सोडले. यामुळे त्या श्वानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आरेतील जैवविविधतेलाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे. ही कृती अनैतिक आणि कायद्याच्या विरोधात आहे. श्वानांना जंगलात सोडणे म्हणजे त्यांना मृत्यूपंथाला लावणे असे मत प्राणीप्रेमी रेश्मा शेलटकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, श्वानांना आरे जंगलात सोडल्याचे कळताच मुंबईतील काही प्राणीप्रेमींनी आरेच्या जंगलात श्वानांचा शोध घेतला. मंगळवारी सायंकाळी यापैकी दोन श्वान जंगलाच्या आतील भागात सापडले. त्यानंतर रात्री उशीर झाल्यामुळे शोधमाहीम थांबविण्यात आली. पुन्हा बुधवारी सकाळी दोन श्वानांची पिल्ले सापडली. स्थानिकांनी हे श्वान टेम्पोमध्ये भरून आरेच्या जंगलात सोडले होते. याची ध्वनिचित्रफीतही समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी दोषींविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
ध्वनिचित्रफितीमुळे प्रकरण उघडकीस
रहिवाशांनी श्वानांना आरे जंगलात सोडताना त्याची ध्वनिचित्रफीत काढली होती. ती मोठ्या प्रमाणात समाजमाध्यामांवर प्रसारित झाली. यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.
पोलीसांकडून मदत नाही
या प्रकरणी मंगळवारी पोलिसांत तक्रार करण्यात आली. मात्र, पोलीस याबाबतीत कोणतेही सहकार्य करीत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. शोधमोहीम प्राणीप्रेमीच करीत असून यासाठी पोलीसांनी कोणतेही मदत केलेली नाही, असाही दावा करण्यात येत आहे.
दोन श्वानांचा मृत्यू
या २० श्वानांना रविवारी आरे जंगलात सोडण्यात आले होते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंगळवारी प्राणीप्रेमींनी शोधमोहीम सुरू केली. या मोहीमेदरम्यान दोन श्वान मृतावस्थेत सापडले. ते जखमी झाले होते. त्यावरून बिबट्याने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असावा अशा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर, नऊ श्वानांना आतापर्यंत जीवदान मिळाले आहे.
भटक्या श्वानांना कुठेही नेऊन टाकणे बेकायदेशीर
भारतीय दंड संहिताअंतर्गत कलम ४२८ आणि ४२९ कलमाखाली कोणत्याही प्राण्याला दुखापत करणे, मारणे किंवा त्यांचा जीव धोक्यात येईल अशा ठिकाणी सोडणे कायद्याने गुन्हा आहे.
वन्य प्राण्यांपासून धोका
आरे जंगलात बिबट्या, कोल्हे आणि माकड यांसारखे वन्य प्राणी आहेत. भटक्या श्वानांना जंगलातील प्राण्यांपासून स्वत:चे संरक्षण करणे कठीण जाते. अनेक वेळा बिबट्यांनी श्वानांची शिकार केल्याच्या घटना घडल्या आहेत.
अन्न, पाण्याची टंचाई
भटक्या श्वानांना शहरात कचऱ्यांतून अन्न मिळते, पण आरेसारख्या जांगलात नियमित अन्न, पाण्याची सोय नसल्याने त्यांना उपाशी राहावे लागते आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
संसर्गजन्य आजार
शहरातील श्वानांना काही संसर्गजन्य आजार असण्याची शक्यता असते. ते आजार जंगलातील इतर प्राण्यांमध्ये पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे संपूर्ण जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो.