अस्वच्छता, श्वानदंशाने त्रासलेल्या संकुलांकडून उपाययोजना
भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आता पाळीव कुत्र्यांचाही जाच सहन करावा लागत आहे. यापासून सुटका व्हावी यासाठी भांडुप येथील एका संकुलाने पाळीव श्वानांसंदर्भात नियमावलीच तयार केली आहे. ही नियमावली स्थानिक पोलीस ठाण्यालाही सादर करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये भटक्या कुत्र्यांबरोबरच पाळीव कुत्र्यांचा आणि त्यांच्या मालकांच्या बेजबाबदार वर्तनाचाही त्रास वाढला आहे. भांडुप पश्चिम येथील ड्रीम कॉम्प्लेक्समध्ये तब्बल सात संकुले आहेत. त्यात अनेक इमारती आहेत. या सर्व संकुलांत मिळून ५५ पाळीव कुत्रे आहेत. त्यांचे निर्बीजीकरण आणि रेबीज लसीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांच्या मालकांनी दिली. या पाळीव कुत्र्यांना इमारतीच्या पायऱ्यांवर, प्रवेशद्वाराजवळ, घराबाहेरील मोकळ्या जागेत एका भांडय़ात खाद्यपदार्थ दिले जातात. कुत्रे ते जमिनीवर सांडवतात. काही कुत्रे भुंकत रहिवाशांच्या अंगावर धावून जातात. वाहनतळातील वाहनांवर चढून बसतात. त्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत तक्रार करूनही कुत्र्यांचे मालक लक्ष देत नाहीत. संकुलाच्या वार्षिक सभेमध्येही या उपद्रवाची गंभीर दखल घेण्यात आल्याचे येथील रहिवासी सांगतात.
कुत्र्यांच्या या त्रासाला आणि त्यांच्या मालकांच्या बेजबाबदारपणाला लगाम घालण्यासाठी एक नियमावलीच तयार करण्यात आली असून ती स्थानिक पोलीस ठाण्यालाही सादर करण्यात आली आहे, अशी माहिती येथील रहिवासी शिरीष सावंत यांनी दिली.
अन्य घटना
- कांदिवली पूर्व येथील सन सिटीमधील संकुलात श्वानप्रेमीने सुरुवातीला २-३ भटक्या कुत्र्यांना पाळले होते. आता तिथे २५ कुत्रे जमू लागले आहेत. विष्ठा, खाद्य पसरलेले असते.कुत्र्यांना त्रास होतो म्हणून नवरात्रीत ध्वनिक्षेपकाचा वापर करू नये, अशी मागणी श्वानप्रेमींनी केली होती असे रहिवासी अजित कवळे यांनी सांगितले.
- अंधेरी पूर्व येथील जेव्हीएलआरजवळ काही श्वानप्रेमी कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालतात, त्यांना प्रशिक्षण देतात. त्यामुळे कुत्रे रहिवाशांच्या मागे लागतात, भुंकतात, अशी माहिती गजानन यशवंत यांनी दिली.
नियमावली
- भटक्या श्वानांना इमारतीत प्रवेश करू देऊ नये.
- ठरावीक भागातच त्यांना खाऊ घालावे.
- त्यांनी केलेला कचरा, मलमूत्र हटवण्याची जबाबदारी मालकांनी घ्यावी.
- रेबीजसंदर्भातील भित्तिपत्रके लावावीत.
- पूर्वपरवानगीशिवाय लस देऊ नये.
- श्वानाने वारंवार अस्वच्छता केल्यास मालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- संकुलातील सदस्याने असे प्रकार पाहिले तर तो साक्षीदार मानला जाईल.