राजकीय नेत्यांपासून बॉलीवूड कलाकारांची चलती असलेले ‘वांद्रे’ हे शहर अनेक विषयांमुळे कायम चर्चेत असते. अगदी अभिनेते आणि राजकीय नेत्यांच्या निवासस्थानापासून, बॅण्ड स्टँड, कार्टर रोड, माउंट मेरी चर्च यांसारखी अनेक ठिकाणांचे लोकांना आकर्षण असते. वांद्रे पश्चिमेला स्थानकापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पाश्चिमात्य पेहरावांसाठी प्रसिद्ध असलेले ‘हिल रोड’ हा तर तरुणींचा अड्डाच. फॅशनेबल कपडे, चपला, दागिने, सौंदर्यप्रसाधने खरेदी करण्यासाठी अगदी उपनगरातून तरुण-तरुणींची येथे गर्दी होते.
वांद्रे पश्चिमेला पूर्वीपासून ख्रिस्ती बांधवांची वस्ती होती. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. अगदी त्यांचे राहणीमान, कपडय़ांच्या पद्धती, बोलण्यांची ढबही निराळी असते. स्थानिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुरू झालेल्या या बाजारावरही त्याची छाप दिसते. वांद्रे परिसरात दोन प्रमुख कपडय़ांचे बाजार आहेत. यात लिंकिग रोड आणि हिल रोडचा यांचा समावेश आहे. यातील हिल रोड या परिसरात १९७० मध्ये कपडय़ांच्या विक्रीसाठी ‘अॅल्को आर्केन’ या इमारतीच्या तळमजल्यावर बाजार सुरू झाला. त्यावेळी येथ केवळ ५० दुकाने होती. आता फेरीवाल्यांची या ठिकाणी फेरीवाल्यांची संख्या ७०० घरात आहे. हा बाजार आता फेरीवाल्यांचा झाला आहे.
रुस्तम बलसारा चौकापासून या बाजाराची सुरुवात होते. साधारण ५०० मीटरच्या अंतरावर हा बाजार पसरलेला आहे. शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या नवीन फॅशनचे कपडे येथे सहज मिळतात. अगदी हॉट शॉटपासून विविध रंगाचे पलाझो, स्टोल, टीशर्ट, विविध प्रकारचे शर्ट, गाउन, जॅकेट, बॅगा, टोप्या, उंच टाचेच्या चपला, पावसाळी फॅशनेबल चपला असे विविध प्रकार येथे विकले जातात. विविधरंगी दागिन्यांसाठी तर पदपथावरच फेरीवाले उभे असतात. त्यांच्याकडेही मोठमोठे झुमके, नाकातली चमकी वा रिंग, हातातील कडा, पैंजण असे विविध प्रकार असतात. येथील एका दुकानात तर ख्रिस्ती धर्मीयांच्या लग्नसोहळ्यासाठी आवश्यक असलेले कपडे विकले जातात. त्याशिवाय गेल्या काही वर्षांत येथे छोटेखानी मॉल सुरू झाले आहेत. म्हणजेच एका दुकानात विविध विभाग करून त्यात कपडय़ांची विक्री केली जाते.
तरुण-तरुणींची हौस इथे भागतेच; पण साडय़ा, कुर्ते, पंजाबी ड्रेस, ओढणी हे पर्यायही काही प्रमाणात उपलब्ध असतात; मात्र या बाजाराची खासियत ही इथे मिळणाऱ्या फॅशनेबल कपडय़ांमध्ये आहे. महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी खरेदी करण्यासाठी येथे मोठी गर्दी होते. आठवडय़ाच्या सुट्टीच्या दिवसांत तर खरेदीचा खरा हंगाम असतो. सकाळपासून सुरू झालेला ग्राहकांचा ओघ रात्रीपर्यंत कायम असतो. त्यामुळे येथे विक्री करणारे फेरीवाले मुंबईतील अनेक होलसेल बाजारातून माल खरेदी करतात. तर अनेकदा विविध ब्रँडशी साधम्र्य असलेले कपडेही येथे विकतात. बहुतांश वेळा या कपडय़ांमध्ये दोष असतो. म्हणजे कपडय़ांना छोटी चीर जाणे, रंग उडणे, धागे निघणे असा दोष सर्वसाधारणपणे दिसून येत नाही. त्यामुळे येथे खरेदी करताना कपडय़ांना व्यवस्थित तपासून पाहणे आवश्यक असते. यातील अनेक कपडे मद्रास, बंगलोर, दिल्ली या भागातून येतो. इतर कपडय़ांच्या बाजाराच्या तुलनेत येथे मिळणारा माल चढय़ा किमतीचा असतो. येथील ग्राहक हा श्रीमंत असल्याने वस्तूंची किंमत चढीच सांगितली जाते; मात्र विक्रेत्यांशी घासाघीस करून ती कमी करण्यासाठी ग्राहक कसोशीने प्रयत्न करीत असतात. येथे खाण्याचीही चंगळ असते. सुरुवातीच्या काळात ‘अॅल्को आर्केन’ या इमारतीखाली इडली, डोसा गाडीवर विकले जात असत. आजकाल येथे एक हॉटेल सुरू करण्यात आले आहे. येथे तुम्हाला पिझ्झा, पावभाजीपासून सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. येथील फालुदा तर अतिशय लोकप्रिय असून अनेकदा बाजारातील खरेदीची सुरुवात फालुदा खाऊनच सुरू होते.
सध्या तर येथे ‘बार्बिक्यू नेशन’ हा खवय्यांना आकर्षित करीत आहे. त्याशिवाय टी व्हिला कॅफे, अमृत सागर हॉटेल येथेही कायम गर्दी असते.
एखाद्या स्टुलावरही विक्रेते माल विकण्यासाठी बसलेले असतात. यातील ७० टक्के विक्रेत्यांचे दुकान नाही, रस्त्याच्या कोपऱ्यांवर पथारी पसरून व्यवसाय सुरू केला जातो. अर्थात हे सर्व जण उत्तर प्रदेश, हरियाणा, बंगाल या राज्यांतून येथे आलेले असतात.
वस्तुविक्रीचे फारसे शिक्षण घेतलेले नसले तरी ग्राहकांशी इंग्रजीत बोलून त्यांना आकर्षित करण्याची यांची तयारी असते. यातील बहुतांश जण बेकायदा विक्रेते म्हणूनच गणले जातात. त्यामुळे स्थानिक पोलिसांची त्यांच्यावर कायम नजर असते. असे असतानाही गेली ३० ते ४० वर्षे सर्व जण व्यवसाय करीत आहेत. काही जण नोकर म्हणून आरंभ केलेल्या अनेक तरुणांनी आता स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे. गेल्या ४० वर्षांत या बाजारात बरेच फेरबदल झाले. तसे पाहता प्रत्येक येणाऱ्या नवीन फॅशननुसार बाजाराचा चेहरामोहरा बदल असतोच. गेल्या अनेक वर्षांत नवीन फेरीवाल्यांची भर पडत आहे. त्यासोबत विविध प्रकारचे कपडेही ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे. नोटाबंदीचा फटका प्रत्येक बाजाराप्रमाणे या बाजारालाही सहन करावा लागला. मात्र या बाजारातील एक विरोधाभासी चित्र तुम्हाला कायम खटकत राहते. ज्या इमारतीपासून या बाजाराची सुरुवात झाली त्या अॅल्को आर्केन या इमारतीत आजही विक्रेत्यांची संख्या तितकीच असली तरी येथे ग्राहकांची संख्या खूपच तुरळक झालेली आढळते. फॅशनेबल कपडय़ांची या इमारतीत कमीच आढळते आणि रस्त्यावर मिळणाऱ्या कपडय़ांच्या तुलनेत येथे किमतीही जास्त असल्यामुळे ग्राहक या फेरीवाल्यांकडे वळला आहे, हेच सत्य आहे.
मीनल गांगुर्डे @MeenalGangurde