मुंबई: सार्वजनिक सुट्टी वगळता मुंबईत कधीही रस्ते रिकामे दिसत नाहीत. मात्र मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल असल्याने दुपारपर्यंत मुंबईतील रस्त्यांवर तुरळक वाहने दिसत होती. त्यामुळे कुठेही वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली नव्हती. गेल्या दोन महिन्यांपासून देशात लोकसभा निवडणुकीची लगभग सुरू होती.
हेही वाचा >>> दारूच्या नशेत दुचाकीवरील तिघांची दुभाजकाला धडक
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये प्राचार फेऱ्या आणि सभांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्यां नागरिकांना भेडसावत होती. त्यातच मुंबई शहरात अनेक ठिकाणी मेट्रो, रस्ते, गटारांची कामे सुरू असल्याने मुंबईकराना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मात्र मुंबईकर मंगळवारी लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहण्यात दंग होते. अनेकांनी घरीच थांबून वृत्तवाहिन्यांवर जाहीर होणारे मतमोजणीचे कल पाहणे पसंत केले. त्यामुळे बहुतांश भागातील रस्त्यांवर शुकशुकाट होता. सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी २ पर्यंत मुंबईतील रस्त्यांवर तुरळक वाहतूक दिसत होती. मात्र दुपारनंतर निकाल स्पष्ट होताच पुन्हा रस्त्यांवर वाहनांची गर्दी वाढू लागली. त्यानंतर विजेत्या उमेदवारांना भेटण्यासाठी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.