प्रसाद रावकर
मुंबई : करोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्यानंतर उठविण्यात आलेले निर्बंध, पूर्वपदावर येत असलेली वाहतूक सेवा आणि रुग्णालयांमध्ये पूर्ववत झालेली रुग्णसेवा आदी कारणांमुळे पालिका रुग्णालयांमध्ये अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. करोनाविषयक निर्बंध हटविण्यात आल्यानंतर अन्य शहरांतून, लगतच्या राज्यांमधून उपचारासाठी पालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, एकूणच रुग्णांचा ओघ वाढल्याने रुग्णालयांवर कमालीचा ताण येऊ लागला आहे.
मुंबई महापालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (केईएम), बाई यमुनाबाई ल. नायर धर्मादाय रुग्णालय, लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय (शीव) आणि कूपर रुग्णालय या चार मुख्य रुग्णालयांसह १७ सलग्न उपनगरीय रुग्णालयांमध्ये रुग्णावर उपचार करण्यात येतात. त्याशिवाय रुग्णांसाठी ठिकठिकाणी पालिकेचे दवाखान्यात आणि आरोग्य केंद्रे उपलब्ध करण्यात आली आहेत. प्रसूतिगृह, क्षयरोग, कुष्ठरोग, कान-नाक-घसा, संसर्गजन्य आजार आदींसाठी स्वतंत्र रुग्णालये आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात.
करोनाच्या पहिल्या लाटेत अन्य आजारांचा त्रास असलेल्या रुग्णांना उपचार मिळणे अवघड बनले होते. करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध हटविण्यात आले. त्यानंतर वाहतूक सेवा पूर्ववत होऊ लागली आहे. तसेच रुग्णालयांमध्ये अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांच्या उपचारांवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. पालिकेच्या केईएम, नायर, शीव आणि कूपर या चार प्रमुख रुग्णालयांमध्ये दररोज २० हजार रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यापैकी काही रुग्णांवर बाह्यरुग्ण विभागात उपचार करण्यात येतात. गंभीर आजार व शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. वाहतूक सेवा पूर्ववत होत असल्याने राज्याच्या अन्य भागांतून, तसेच परराज्यांतील रुग्ण उपचारासाठी पालिका रुग्णालयात येऊ लागले आहेत. या चारही रुग्णालयांमधील दैनंदिन रुग्णसंख्येतील ३० टक्के रुग्ण मुंबई बाहेरील असल्याचे निदर्शनास आले आहे.
पालिका रुग्णालयांमध्ये उपचारासाठी मोठय़ा संख्येने रुग्ण येऊ लागले आहेत. त्यामध्ये मुंबईबाहेरील रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र असे असले तरी राज्यातील अन्य भागातून, तसेच परराज्यांतून येणाऱ्या रुग्णांवरही योग्य ते उपचार करण्यात येतील. – सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा