मुंबई : काही मॉल्स्, उपाहारगृहे, व्यापारी संकुले आदी ठिकाणी मंजूर बांधकाम नकाशानुसार वाहनतळाचा वापर न करता त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर केला जात आहे. अशा वास्तुंवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवारी दिले. मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांतील (वॉर्ड) कामांचा भूषण गगराणी यांनी सोमवारी आढावा घेतला. या आढावा बैठकीत सशुल्क वाहनतळ (पे ॲण्ड पार्क) या मुद्दयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आयुक्तांनी वरील आदेश दिले.
महानगरपालिकेच्या माध्यमातून मध्य मुंबई, पश्चिम मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहनतळ सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. वाहनतळाच्या माध्यमातून महसूल संकलन करणे हा महानगरपालिकेचा उद्देश नसून नागरिकांना विनासायास वाहनतळ सुविधा उपलब्ध करणे हा हेतू आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी मोबाईल ॲप विकसित करण्यात येत आहे. वाहनतळ सुविधेबरोबरच बेकायदा वाहनतळ, रस्त्यांवर वाहने लावून वाहतुकीस अडथळा करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी. त्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घ्यावी, असे भूषण गगराणी यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा >>>वरळीतील सत्यम’ चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड जाणार; आरक्षण बदलण्यासाठी पालिकेने मागवल्या हरकती सूचना
गजबजलेल्या मुंबईतील वाहतुकीस शिस्त लागावी यासाठी विभाग कार्यालय, पोलीस अंमलदार आणि महानगरपालिकेची वाहतूक मध्यवर्ती यंत्रणा आदींनी समन्वयाने सातत्याने कारवाई करावी. शॉपिंग मॉल्स्, उपाहारगृहे, व्यापारी संकुले आदी व्यावसायिक आस्थापनांनी इमारत बांधकाम परवाना घेताना वाहनतळाची तजवीज दाखवून महानगरपालिकेची परवानगी घेतली आहे. मात्र, काही ठिकाणी वाहनतळांच्या जागा बंदीस्त करून त्याचा व्यावसायिक वापर केला जात आहे. वाहनतळांच्या जागा बंदीस्त करून त्याचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी. वाहनतळाच्या जागांचा इतर कारणांसाठी केला जाणार वापर रोखायला हवा. या कामी शहर अभियंता व संबंधित विभागांचे सहायक आयुक्त यांनी संयुक्तपणे स्थळ पाहणी करावी व तात्काळ कठोर कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.