* पंधरवडय़ात १०० गाडय़ांच्या चाकांमधील हवा काढली
* कारवाईविरोधात प्रवाशांमध्ये असंतोष
मुंबई शहर आणि उपनगरांत पार्किंगची जागा, ही फारच मोठी समस्या बनली आहे. अगदी दर दिवशी रेल्वे स्थानकापर्यंत आपापल्या दुचाकींनी येणाऱ्या प्रवाशांना आपली गाडी ठेवायची कुठे, हा प्रश्न सतावत असतो. रेल्वेतर्फे देण्यात आलेल्या अधिकृत पार्किंग क्षेत्रात जागा कमी असल्याने अनेकदा प्रवासी स्थानक परिसरात जागा मिळेल तिथे गाडी उभी करतात. मात्र अशा पद्धतीने अनधिकृत पार्किंग करणाऱ्या पश्चिम उपनगरांतील प्रवाशांना गेल्या पंधरा दिवसांत चांगलाच दणका बसला आहे. रेल्वे सुरक्षा दलाने या बेकायदेशीर पार्किंगविरोधात केलेल्या कारवाईत गेल्या १५ दिवसांत १०० गाडय़ांच्या चाकांमधील हवा काढली आहे.
येत्या काही दिवसांत अनधिकृत पार्किंगच्याबाबत अशीच कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलातर्फे सांगण्यात आले. मात्र गाडी अनधिकृत ठिकाणी उभी असेल, तर दंडात्मक कारवाई करण्यात काहीच गैर नाही. पण गाडीचे नुकसान होईल, अशी कोणतीही गोष्ट रेल्वे सुरक्षा दलाचे जवान कसे करू शकतात, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.
पश्चिम रेल्वेमार्गावर चर्चगेट ते विरार या दरम्यान अनेक स्थानकांबाहेर पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आलेल्या अधिकृत पार्किंगच्या जागा आहेत. या जागा कंत्राटी पद्धतीने कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत. मात्र उपनगरांतील प्रवासी संख्या आणि घरापासून स्थानकापर्यंत दुचाकीने येणाऱ्या प्रवाशांची संख्या विचारात घेता ही जागा अत्यंत अपुरी आहे. त्यामुळे प्रवासी आपापल्या सोयीनुसार स्थानक परिसरात जागा मिळेल तिथे गाडी उभी करतात. ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असून यामुळे वाहतूक कोंडीही होत असल्याचा दावा रेल्वे सुरक्षा दलातर्फे केला जातो.
त्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने अशा अनधिकृत वाहनचालकांविरोधात कारवाई सुरू केली आहे. यंदाच्या वर्षांत ऑगस्ट २०१५ पर्यंत अशा ४३८२ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढली आहे. यात वांद्रे, गोरेगाव, बोरिवली, अंधेरी, भाईंदर आणि विरार या महत्त्वाच्या स्थानकांच्या परिसरात कारवाई करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय रेल्वे आयुक्त आनंद विजय झा यांनी सांगितले.
प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करूनही फार फरक पडत नाही. त्यामुळे आता यापेक्षा कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने आता वाहनांच्या चाकाची हवा काढण्यात येत आहे. गेल्या १५ दिवसांत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी १०० वाहनांच्या चाकांतील हवा काढली आहे. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास होत असून दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी गाडी उभी करण्याआधी चालक विचार करत आहेत. परिणामी, ही शिक्षा परिणामकारक ठरत असल्याचे दिसत आहे, असेही झा म्हणाले.
मात्र प्रवाशांमध्ये या कारवाईविरोधात प्रचंड संताप आहे. दिवसभर थकून-भागून, लोकलमधील गर्दीतून प्रवास करून स्थानकात उतरल्यावर घरी पोहोचण्यासाठी गाडी काढावी, तर गाडीच्या चाकांमधील हवा कोणी तरी काढल्याचे आढळले. अनधिकृत भागात गाडी लावण्याची हौस आम्हाला नाही. मात्र अधिकृत पार्किंगच्या ठिकाणी गाडी उभी करायला जागा नसते, असे मालाडच्या परेश दोशी यांनी सांगितले. आम्ही जेथे गाडय़ा लावतो, तेथे पोलिसांच्याही गाडय़ा सर्रास उभ्या असतात. त्यामुळे येथेही गाडय़ा लावल्या तर चालतात असा आमचा समज होतो. या पोलिसांच्या गाडय़ांची हवाही काढली जाते का, अशी शंका गोरेगाव येथे राहणाऱ्या मंदार देसाई यांनी उपस्थित केली. गाडी अनधिकृत ठिकाणी उभी असेल तर ती उचलून दंड वसूल करावा, पण गाडीची हवा काढण्याचा प्रकार संतापजनक आहे. गाडीचे अधिक नुकसान झाले असल्यास तेदेखील रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनीच केले, असे समजायचे काय आणि मग आम्हाला त्या नुकसानाची भरपाई मिळणार का, असे प्रश्नही प्रवासी उपस्थित करत आहेत.

Story img Loader