मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील वायू प्रदूषणात वाढ झाली असून ते रोखण्यासाठी यापूर्वीच काढण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे व प्रमाण कार्यपद्धतीचे बांधकाम आणि प्रदूषणाशी संबंधित सर्व सरकारी तसेच खासगी संस्था, संघटना आदींनी काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवारी दिले.
सर्व सरकारी तसेच खासगी संस्था, संघटना यांच्याकडून ही मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रमाण कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे की नाही यावर देखरेख ठेवण्यात येणार असल्याचेही गगराणी यांनी सांगितले. वायू प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असलेल्या छोट्यामोठ्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. बांधकामाच्या ठिकाणी स्वयंपाक बनवण्यासाठी लाकूड व तत्सम बाबी इंधन म्हणून जाळणे तसेच शेकोटी पेटवणे यासारखे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासंदर्भात विविध मुद्द्यांवर महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांनी आपापल्या स्तरावरील धोरणे, कार्यवाही यांची माहिती यावेळी सादर केली. मार्गदर्शक तत्वानुसार, सर्व प्रकल्प प्रस्तावकांनी ७० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या बांधकाम प्रकल्पाभोवती किमान ३५ फूट उंच पत्रा/धातूचे आच्छादन उभारणे अनिवार्य आहे. याशिवाय, बांधकामाधीन इमारतींना सर्व बाजूंनी हिरवे कापड/ज्यूट/ताडपत्रीने पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे बंधनकारक आहे. बांधकामाच्या ठिकाणी धूळीचे कण निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारा राडारोडा व अन्य साहित्यावर सातत्याने आणि न चुकता पाण्याची फवारणी करणे, बांधकाम साहित्य वाहून नेणारी सर्व वाहने पूर्णपणे झाकलेली असावीत, बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सामानांची ने-आण करणाऱ्या वाहनांची चाके स्वच्छ असल्याची खात्री करण्यासाठी सर्व बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, ग्राइंडिंग, कटिंग, ड्रिलिंग, सॉइंग आणि ट्रिमिंगचे काम बंदिस्त भागात करणे, केवळ ट्रॅकिंग सिस्टम बसवलेल्या वाहनाचा वापर करणे आदी विविध मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे विकासकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, आठ वर्षांहून अधिक जुन्या अवजड डिझेल वाहनांना मुंबईत वाहतूक करण्यास सक्त मनाई असणार आहे. तसेच, बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कामगारांसाठी जेवण तयार करण्यासाठी वापरात येणाऱ्या लाकूड व तत्सम इंधनामुळे वायुप्रदूषण होऊ नये, यासाठी संबंधित विकासकांनी कामगारांच्या भोजनाची व्यवस्था करावी, अशा सूचनाही विकासकांना करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – राज्याचे गृहनिर्माण धोरण पुन्हा लांबणीवर
अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी पथक तैनात
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची योग्यरीत्या अंमलबजावणी केली जात आहे की नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक विभागात पथक तैनात करण्यात येणार आहे. या पथकात एक वाहन, दोन प्रभाग अभियंत्यांसह एक पोलीस आणि मार्शलचा समावेश असणार आहे. प्रत्येक पथकाचे नेतृत्व विभाग कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी करणार आहे.
विभागनिहाय पथकांची संख्या
१) लहान विभाग- प्रत्येक विभागासाठी दोन पथके
२) मध्यम विभाग- प्रत्येक विभागासाठी चार पथके
३) मोठे विभाग- प्रत्येक विभागासाठी सहा पथके