राज्य सरकारने लागू केलेल्या स्थानिक संस्था कराविरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनात ठाण्यातील उपहारगृह चालकांनीही उडी घेतली आहे. हॉटेल व्यावसायिकांनी बुधवारपासून पुकारलेल्या बंदला ठाणे शहरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि उपाहारगृहांसह सर्वच दुकाने बंद राहिल्याने ठाण्यातील रस्ते सुनेसुने दिसत होते.
हॉटेलांचे शटर्स सकाळपासूनच बंद असल्याने ग्राहकांनी दिवसभर वेगवेगळ्या खाऊगल्ल्यांकडे मोर्चा वळविला खरा, मात्र वडापाव, चहा, पाणीपुरी, भेळ विक्रेत्यांनीही धंदा बंद ठेवल्याने चाकरमान्यांचे हाल झाले. ठाणे रेल्वे स्थानकालगत काही ताडगोळे विक्रेत्यांचा धंदा मात्र जोरात होता.
शुक्रवारपर्यत ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील सर्व उपहारगृहे बंद ठेवण्यात येतील, अशी माहिती ठाणे हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष साईप्रसाद शेट्टी यांनी दिली. शहरातील सर्व लहान हॉटेल व्यावसायिक, फास्ट फुड कॉनर्स, खानावळ्या या बंदमध्ये सहभागी होतील, असेही सांगण्यात आले.
दरम्यान, बंद आंदोलन गुरुवारीही सुरुच राहील, अशी माहिती व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मुकेश सावला यांनी पत्रकारांना दिली. दूध, अंडी, ब्रेड, भाज्या, फळे अशा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.