मुंबई : काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचविण्याकरिता भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पराभूत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. प्रदेश काँग्रेसच्या प्रतिनिधीसमोर आपली भूमिका मांडताना ही  निवडणूक व्यक्तिगत नाही, माझा सामूहिक नेतृत्वावर विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार खरगे यांनी टिळकभवन येथे प्रदेश प्रतिनिधींशी संवाद साधला. 

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आपण का लढवीत आहोत, त्याची पार्श्वभूमी सांगताना खरगे म्हणाले की, राहुल गांधी यांना अध्यक्ष करावे, अशीच माझी भूमिका होती. मी तशी सोनिया गांधी यांना विनंती केली. परंतु गांधी कुटुंबातील कुणीही अध्यक्ष होणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर काही वरिष्ठ नेत्यांनी माझी भेट घेऊन मला अध्यक्षपदाचे उमेदवार होण्याची विनंती केली. मी ती मान्य केली. या देशात काँग्रेसची विचारधारा मजबूत करण्यासाठी मी काम करणार आहे, तसेच उदयपूर घोषणापत्राची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पटोले यांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : राज्यात कटकारस्थान करून सत्तेवर आलेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने शुक्रवारी शंभर दिवस पूर्ण केले. परंतु या शंभर दिवसांत सरकारने काय केले? सत्ताधारी पक्षाचे खासदार, आमदारच खुलेआम गुंडगिरीची भाषा करू लागले आहेत, कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हल्ला चढविला. महाराष्ट्रापेक्षा गुजरातचे हित पाहणारे हे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

Story img Loader