लैला..लैला, शालू के ठुमके, जलेबी बाई.. मल्लिका शेरावतच्या चित्रपटांपेक्षा तिच्या या आयटम साँग्जचीच जास्त चर्चा होते. आणि तरीही आता आयटम साँग नको, ‘मर्डर’सारख्या भूमिका नको. चांगल्या, सशक्त भूमिकाच करायच्या आहेत, असे मल्लिका शेरावतने ठासून सांगितले आहे. मोठय़ा पडद्यावरून सध्या एका रिअ‍ॅलिटी शोच्या निमित्ताने छोटय़ा पडद्यावर उतरलेल्या मल्लिका शेरावतने प्रसिध्दीमाध्यमांसमोर ही मुक्ताफळे उधळली आहेत.
‘किस्मत, लव, पैसा, दिल्ली’ नावाच्या चित्रपटात काम करून तिने बॉक्स ऑफिसवर आपले नशीब आजमवून पाहण्याचा प्रयत्न केला. पण अजूनतरी तिच्या चित्रपटाची किंवा आयटम साँगची चर्चा ऐकू आलेली नाही. त्यावर मला आयटम साँग आणि ग्लॅमरस भूमिकांच्या ऑफर येत आहेत. पण मी जाणीवपूर्वक त्या नाकारते आहे,असे उत्तर मल्लिकाने  दिले आहे. मर्डर’, ‘बचके रेहना रे बाबा’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’, ‘वेलकम’, ‘अगली और पगली’ अशा चित्रपटांमधून काम करूनही बॉलिवुडमध्ये अभिनेत्री म्हणून तिला स्थान मिळालेले नाही. तिने जॅकी चॅनबरोबर हॉलिवूडपटातही काम करून पाहिले, ‘कान्स’सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांनाही हजेरी लावून झाली. ती पुन्हा हॉलिवुडपटामध्ये काम करणार, अशी चर्चा सुरू झाली होती मात्र, तसे काहीही नसल्याचे मल्लिकाने स्वत:च स्पष्ट केले आहे.
सध्या ती ‘डर्टी पॉलिटिक्स’ नावाच्या चित्रपटात काम करते आहे. या चित्रपटात आपली भूमिका पूर्णपणे वेगळी आणि देशी असल्याचे मल्लिकाने सांगितले. के. सी. बोकाडिया दिग्दर्शित या चित्रपटात ओम पुरी, जॅकी श्रॉफ, अनुपम खेर आणि आशुतोष राणा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय, ‘लाईफ ओके’ वाहिनीवरील ‘बॅचलोरेट इंडिया : मेरे खयालों की मल्लिका’ नावाच्य रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती काम करते आहे. ‘द बॅचलर युएसए’ या मूळ अमेरिकन शोच्या धर्तीवर हा  रिअ‍ॅलिटी शो होणार असून तीसजणांशी डेटिंग करून त्यातून आपल्यासाठी योग्य तो जोडीदार मल्लिका निवडणार आहे.    

Story img Loader