शैलजा तिवले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणालाही संसर्ग होऊ नये म्हणून हातानेच आपल्या मुलाला देखील ती दूर राहण्यास सांगत होती. पक्षाघात झालेला वृद्ध पती आणि कमरेखाली अधू असलेल्या मुलाला घेऊन ती रुग्णालयाच्या मागच्या मोकळ्या जागेत कोणी दाखल करून घेईल या प्रतीक्षेत बसली होती. कुटुंबातील तिघांचेही तापाने अंग फणफणत होते. मुलाला धापही लागत होती. कोणतेही रुग्णालय दाखल करून घेत नसल्याने अखेर कुर्ल्याच्या भाभा रुग्णालयात हे तिघेही आशेने आले होते.

पवई येथे राहणाऱ्या या कुटुंबातील व्यक्ती १५ मे रोजी कोल्हापूरला गेली होती. तिथे तिला करोना संसर्ग झाल्याचे आढळले. दुसऱ्या दिवसापासून घरातील एकाएकाला ताप, उलटय़ा सुरू झाल्या. घराजवळील खासगी डॉक्टरकडे उपचार सुरू केले, परंतु ताप कमी होत नव्हता. त्यात आईला न्यूमोनिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता कुठे जायचे, काय करायचे म्हणून त्यांच्या मोठय़ा मुलाने पालिकेच्या आरोग्य केंद्रापासून ते अगदी नगरसेवकापर्यंत अनेकांना गाठले. अखेर २५ मे ला पालिकेच्या डॉक्टरांनी घरी येऊन तपासले आणि कुर्ला भाभाला नेण्याची चिठ्ठी दिली.

‘हजार रुपये खर्च करून रुग्णवाहिकेत घालून आईवडिलांना इथे आणले तर सांगतात खाट नाही. आता या तिघांना घेऊन मी कुठे जाणार, असा प्रश्न मुलाने उपस्थित केला आहे.

अशी अनेक कुटुंबे उपचार तर सोडा परंतु केवळ चाचणी करून घेण्यासाठीही वणवण भटकत आहेत. संशयित रुग्णांची चाचणी करण्याची जबाबदारी पालिकेने विभागीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सोपविली आहे. परंतु विभागातील गोंधळामुळे रुग्णांना तपासणी करण्यासाठी अनेक हेलपाटे घालावे लागत आहेत.

दोन दिवसांनी अहवालही नाही

माझ्या पत्नीला तीन दिवसांपासून ताप येत आहे. धाप लागल्याने तिला जवळील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. परंतु त्यांनी चाचणी करण्यासाठी चिठ्ठी दिली नाही. विभागातील अधिकाऱ्यांनाही कळविले. तिला अधिकच त्रास व्हायला लागल्याने रहेजा रुग्णालयात नेले असता त्यांनी घेण्याचे नाकारले. शेवटी टिळक रुग्णालयात आणले. इथेही एक रात्र एक दिवस गेल्यानंतर तिचे नमुने चाचणीसाठी पाठविले आहेत. त्यालाही आता दोन दिवस उलटले. अजून अहवाल आलेला नाही. तिला करोना झाला आहे की नाही हेच अजून कळलेले नाही. त्यामुळे कुटुंबातल्या इतरांचीही काळजी वाटत असल्याचे धारावीतील आगावणे यांनी सांगितले. खासगी डॉक्टरांनी प्रत्यक्ष तपासणी करून चिठ्ठी दिल्याशिवाय चाचणी होणार नाही, असा फतवा पालिकेने काढला आहे. त्यात तपासणी करून चिठ्ठी दिलेल्या डॉक्टरलाही पालिकेने नुकतीच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता खासगी डॉक्टर चिठ्ठी लिहून देण्यास सहसा तयार नाहीत. एकीकडे इतर रुग्णालये करोना असेल या भीतीने दाखल करत नाहीत आणि दुसरीकडे सरकारी रुग्णालयांमध्ये खाटा नाहीत. त्यामुळे करोना आहे की नाही हे जाणून घेण्यासाठीदेखील रुग्णांची धडपड सुरू आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Struggle for corona testing abn