मुंबई : जुन्या निवृत्ती वेतनाच्या मागणीवरून वातावरण तापलेले असतानाच मुंबई महानगरपालिकेमधील कार्मचारी संघटनांमध्ये मात्र अस्तित्वाच्या लढाईसाठी संघर्ष सुरू झाला आहे. जुन्या निवृत्ती वेतनाच्याच मागणीसाठी दि म्युनिसिपल युनियनने १४ मार्च रोजी आयोजित केलेल्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेतील अन्य कर्मचारी संघटनांना केले. मात्र काही संघटनांनी एकत्र येऊन वेगळी चूल मांडून याच दिवशी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मोर्चातील सहभागी अधिक असावेत यासाठी संघटनांची रस्सीखेच सुरू आहे, तर कोणाच्या मोर्चात सहभागी व्हायचे असा प्रश्न महानगरपालिकेतील समस्त कर्मचारी, कामगार वर्गाला पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कामगार, अग्निशमन दल आदींच्या तब्बल ३६ संघटना आहेत. या सगळ्या संघटना आपापल्या सदस्यांच्या मागण्या मुंबई महानगरपालिका प्रशासनासमोर मांडत आहेत. एकेकाळी ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या नेतृत्वाखालील म्युनिसिपल मजदूर युनियन, शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, दि म्युनिसिपल कामगार संघ अशा काही मोजक्याच बलाढ्य संघटना कार्यरत आहेत. काही वर्षांपूर्वी म्युनिसिपल मजदूर युनियनमध्ये अंतर्गत मतभेद झाले आणि शरद राव यांच्या काही कनिष्ठ समर्थकांनी संघटनेला रामराम ठोकला आणि दि म्युनिसिपल युनियनची मुहूर्तमेढ रोवली. या संघटनेनेही आता महानगरपालिकेत चांगलेच बस्तान बांधले आहे.

हेही वाचा – ‘मेट्रो ५’च्या दुसऱ्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात; भिवंडी – कल्याण टप्प्यातील कामासाठी निविदा जारी

जुन्या निवृत्ती वेतन योजनेसाठी १४ मार्च रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय दि म्युनिसिपल युनियनने १ मार्च रोजी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात जाहीर केला आणि त्याचबरोबर महानगरपालिकेतील अन्य कर्मचारी संघटनांनीही त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने तात्काळ दि म्युनिसिपल युनियनला पत्र पाठवून मोर्चाला पाठिंबा दिला. मात्र म्युनिसिपल मजदूर युनिनयने याच मागणीसाठी ११ मार्च रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली. तशी भित्तीपत्रके महानगरपालिकेच्या कार्यालयांमध्ये झळकली. मात्र काही दिवसांतच या संघटनेने मोर्चा रद्द केला आणि मुंबई महानगरपालिकेतील काही कर्मचारी संघटनांची मोट बांधून मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली १४ मार्च रोजी जुन्या निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली. इतकेच नाही तर दि म्युनिसिपल युनियनच्या मोर्चाला पाठिंबा देणाऱ्या म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनेही समन्वय समितीच्या मोर्चात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे.

हेही वाचा – “पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना गोपीनाथ मुंडेंची आठवण येतेय”, भातखळकरांच्या विधानावर धनंजय मुंडे संतापले; म्हणाले…

दि म्युनिसिपल मजदूर युनियनच्या भूमिकेमुळे मुंबई महानगरपालिका कर्मचारी, कामगारांचे एकाच मागणीसाठी एकाच दिवशी दोन वेगवेगळे मोर्चे आझाद मैदानावर धडकणार आहेत. कामगार संघटनांमधील वर्चस्वाच्या संघर्षामुळे कर्मचारी आणि कामगार मात्र संभ्रमित झाले आहेत. कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचे, असा प्रश्न पडल्यामुळे काही कर्मचाऱ्यांनी मोर्चापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली आहे. तर कामगार संघटनांनी आपापल्या मोर्चाला कर्मचारी, कामगारांची गर्दी व्हावी यासाठी कंबर कसली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Struggle for supremacy among trade unions in the mumbai mnc two marches of workers on the same day for the same demand mumbai print news ssb