मुंबई: महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा वकूब नसताना ज्या पक्षाने एवढे दिले तो पक्ष आणि कुटुंब संकटात असताना, सत्तेसाठी पळ काढला. खुर्ची टिकवण्यासाठी छळ, कपट करणाऱ्यांची भाटगिरी करत आहात. तुम्ही धोरणी राजकारणी असू शकाल; पण माणूस म्हणून भणंग आणि कफल्लक आहात, अशा  शब्दांत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांना एका पत्राद्वारे फटकारले आहे.

 गोऱ्हे यांनी शुक्रवारी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करताना अंधारे यांचा ‘सटरफटर’ असा उल्लेख केला होता. त्यावरून संतप्त झालेल्या अंधारे यांनी एका खुल्या पत्राच्या माध्यमातून गोऱ्हे यांच्यावर  टीका केली आहे. ‘काही माणसे पदामुळे मोठी होतात. काही पदे माणसांमुळे मोठी होतात; पण काही माणसे निव्वळ माणसांमुळे मोठी होतात. तुम्ही यातल्या पहिल्या प्रकारातल्या आहात’ असा प्रारंभीच टोमणा मारत अंधारे यांनी गोऱ्हे यांचे वाभाडे काढले आहेत. भांडवली व्यवस्थेविरुद्ध विचार मांडता मांडता तुम्ही स्वत:च त्या व्यवस्थेचा भाग कधी झालात हे तुम्हालाच कळले नाही.

स्त्री आधार केंद्राचा गवगवा करत अनेक पदे, पुरस्कार अन् माया जमा करणाऱ्या तुम्ही खेळाडू महिलांबद्दल अवाक्षरानेही बोलला नाहीत. ना कृषी कायदा आंदोलनात चिरडलेल्या शेतकऱ्यांबद्दल  शब्द काढला. ही केवढी मोठी शोकांतिका म्हणायची.! तुम्हाला राजकीय जन्म प्रकाश आंबेडकरांनी दिला; पण समोर संधी दिसताच तुम्हाला त्यांचाही विसर पडला. कालचा तुम्ही केलेला उल्लेखही तुमच्यातला काठोकाठ भरलेला जातीय विखार सांगणारा होता. तुम्ही भलेही कितीही पदे भोगली (हो भोगलीच, भूषवली नाही) असतील; पण माणूस म्हणून तुम्ही कमालीच्या भणंग आणि कफल्लक आहात. कारण ना तुम्ही कुणाला मदतीचा हात देऊ शकता, ना कुणाचा उत्कर्ष बघू शकता, ना उपकारकर्त्यांची जाणीव ठेवू शकता, अशी टीका या पत्रातून अंधारे यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.