मुंबई : मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगराला झोडपून काढले. भांडुप, शीव, कुर्ला, दादर, अंधेरी, पवई येथील सखल भागात पाणी भरले. तसेच सोमवारी पहाटेपासून रेल्वे रुळावर पाणी साचल्याने, लोकल सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक स्थानकांवर प्रवासी अडकले आहेत. रेल्वेगाड्या एकाच ठिकाणी थांबल्याने लोकल वाहतूक कोलमडली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या जादा बस चालवण्यात येत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आला असून काही ठिकाणी पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्री १ वाजल्यापासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पहाटे ५ वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे मुंबईतील विविध भागात पाणी साचले आहे. हिंदमाता परिसर, दादर, माटुंगा, भांडूप, अंधेरी, कुर्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. हार्बर मार्गावरील एलटीटी आणि चुनाभट्टी स्थानकात पाणी साचले. त्यामुळे पहाटे ठाणे-सीएसएमटी लोकल सेवा बंद करण्यात आली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी आणि त्यांना रस्ते वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी एसटीच्या जादा बस सोडण्यात आल्या आहेत.
हेही वाचा… Mumbai Rains : मुंबईत मुसळधार का ?
सध्या एसटीच्या १०० टक्के बस फेऱ्या सुरू असून नियमित मार्गाव्यतिरिक्त जादा बस चालवण्यात येत आहेत. पनवेल, कुर्ला, दादर, ठाणे, कल्याण या भागात एसटीच्या बस सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.