धारावी लेबर कॅम्प परिसरातील गांधी मेमोरिअल स्कूलमध्ये शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या मलेरिया तपासणी शिबिरात क्लोरोक्विनच्या अधिक गोळ्या खाल्ल्यामुळे एका विद्यार्थिनीला आपले प्राण गमवावे लागले. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप धारावीकरांकडून करण्यात येत आहे.
गांधी मेमोरिअल स्कूल आणि विपुल फाऊंडेशन, धारावी या सामाजिक संस्थेने शाळेमध्ये संयुक्तरित्या मलेरिया तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. मलेरिया नियंत्रणाचे काम करणाऱ्या पालिकेच्या सर्वेलन्स विभागातील शोधक (इनव्हेस्टिगेटर) आणि निरीक्षक यांना शिबिरात पाचारण करण्यात आले होते. या शिबिरात १०८ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान काही विद्यार्थ्यांमध्ये तापाचे लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्यांना क्लोरोक्विनच्या गोळ्या देण्यात आल्या. या शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या शेहनाझला खान (१३) या विद्यार्थिनीलाही गोळ्या देण्यात आल्या. मात्र दुपारी १ च्या सुमारास अचानक शेहनाझला उलटय़ा होऊ लागल्याने तात्काळ तिला घरी पाठविण्यात आले. उलटय़ांचे प्रमाण वाढत गेल्यामुळे पालकांनी शेहनाझला शीव रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरू असताना तिचे निधन झाले.
शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक अथवा विपुल फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी उलटय़ा होऊ लागताच शेहनाझला रुग्णालयात दाखल केले असते तर वेळीच उपचार झाले असते आणि तिचे प्राण वाचले असते. परंतु तसे न करता तिला घरी पाठविण्यात आले. तसेच इतक्या गोळ्या शेहनाझला दिल्या कुणी, असे प्रश्न शेहनाझच्या पालकांनी उपस्थित केले आहेत. आपल्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे पाहून काही विद्यार्थ्यांनी आपापसात क्लोरोक्विनच्या गोळ्या खाण्याची शर्यत लागली होती. शेहनाझने ११ गोळ्या खाल्ल्या आणि तिला उलटय़ा होऊ लागल्या, असा संशय शाहू नगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यानी व्यक्त केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा