शाळेच्या रखवालदाराने ९ वीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना गोरेगाव येथील नंदादीप विद्यालय शाळेत उघडकीस आली आहे. वनराई पोलिसांनी याप्रकरणी शाळेचा रखवालदार हरिशंकर तिवारी (५०) याला अटक केली आहे. १९ जानेवारी रोजी ही घटना घडली होती.
  गोरेगाव पूर्व, जयप्रकाश नगर येथील नंदादीप विद्यालयात हा प्रकार घडला. १९ जानेवारी रोजी चाचणी परीक्षा सुरू होती. दुपारी अडीच वाजता पीडित मुलगी पेपर लवकर सोडवून बाहेर निघाली होती. त्यावेळी तिवारी याने तिला भेळ खाण्यासाठी आपल्या केबीनमध्ये बोलावले. या शाळेतील मुलांना मधल्या सुट्टीत खाऊ देण्यात येतो. ही मुलगी केबीनमध्ये गेली असता हरिशंकरने तिला पाठीमागून पकडून तिचा विनयभंग केला. त्याही अवस्थेत या पीडित मुलीने तिवारीच्या हाताला जोरदार चावा घेत स्वत:ची सुटका करवून घेतली. २८ जानेवारीला शिक्षकांना हा प्रकार समजल्यानंतर २९ जानेवारीला वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रखवालदाराला अटक करण्यात आली.