‘राज्य लोकसेवा आयोगा’च्या (एमपीएससी) पूर्व परीक्षेतील चुकीच्या उत्तरांसाठी कापला जाणारा ‘निगेटिव्ह’ गुणांचा टक्का वाढल्याने उमेदवार हवालदिल झाले आहेत. एमपीएससीने ७ एप्रिलला होणाऱ्या पूर्व परीक्षेच्या तोंडावरच हा निर्णय घेतल्याने उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
गेल्या वर्षीपासून एमपीएससीने ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’च्या धर्तीवर चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह गुणांची पद्धत अंमलात आणली. गेल्या वर्षी मुख्य परीक्षेसाठी ती ३:१ अशी होती. म्हणजे तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण कापायचे. पूर्व परीक्षेसाठी ती थोडी शिथील म्हणजे ४:१ या प्रमाणे होती. म्हणजे चार चुकीच्या उत्तरासाठी एका प्रश्नाचे गुण कापायचे.
एमपीएससीने या वर्षीच्या पूर्व परीक्षेसाठी फेब्रुवारी, २०१३रोजी दिलेल्या पूर्व परीक्षेच्या अधिसूचनेत निगेटिव्ह गुणांच्या प्रमाणाचा कोणताही उल्लेख केला नव्हता. त्यामुळे, या वर्षीही पूर्व परीक्षेसाठीही एमपीएससी गेल्या वर्षीच्या ४:१ या प्रमाणाच्या आधारे गुण कमी करेल, असा उमेदवारांचा अंदाज होता. पण, तीन-चार दिवसांपूर्वी परीक्षाविषयक माहितीत बदल करून एमपीएससीने हे प्रमाण वाढवून ३:१ केले आहे. परीक्षेच्या तोंडावरच हे बदल करण्यात आल्याने परीक्षार्थी उमेदवार मात्र हवालदिल झाले आहेत. एमपीएससीची पूर्व परीक्षा ७ एप्रिलला होणार आहे.
यावर्षी पूर्व परीक्षा ‘जनरल स्टडीज’ आणि ‘सीसॅट’ या दोन विषयांच्या प्रत्येकी २०० गुणांसाठी घेतली जाणार आहे. त्यापैकी सीसॅटमधील ‘डिसिजन मेकिंग – प्रॉब्लेम सॉल्व्हिंग’ हा विभाग वगळून सर्व प्रश्नांच्या तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण कमी करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत चुकीच्या उत्तरांसाठी गुण कमी करण्याची पद्धत एमपीएससीत नव्हती. गेल्या वर्षी एमपीएससीने मुख्य परीक्षेच्या स्वरूपात यूपीएससीच्या धर्तीवर बदल केले. हे करताना अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाबरोबरच निगेटिव्ह गुणांची पद्धतीही एमपीएससीने अंमलात आणली. ‘पूर्व परीक्षेचे स्वरूप वैकल्पिक असले तरी निगेटिव्ह गुणांमुळे उमेदवारांना आता उत्तरे अधिक अचूकपणे द्यावी लागणार आहेत. कारण, आता तीन चुकीच्या उत्तरांसाठी गुण कमी होणार आहे. त्यामुळे, हा बदल स्वागतार्ह आहे,’ अशी प्रतिक्रिया ‘लक्ष्य अकादमी’चे अजित पडवळ यांनी व्यक्त केली.
परीक्षेच्या तोंडावर बदल जाहीर करण्याच्या एमपीएससीच्या निर्णयावर अनेक उमेदवार मात्र नाराज आहेत. ‘एमपीएससी आपल्या परीक्षेचा दर्जा वाढविण्यासाठी यूपीएससीप्रमाणे बदल करते आहे इतपत ठीक आहे.  मात्र यूपीएससीतील केवळ सोयीच्या पद्धती स्वीकारायच्या आणि नसलेल्या नाकारायच्या हा कुठला प्रकार झाला,’ अशी नाराजी या उमेदवाराने व्यक्त केली.
नेमका काय बदल आहे?
*    दर चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण कापले जाण्याऐवजी आता दर तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण कापले जाणार
*    पूर्वपरीक्षेला अवघे १५ दिवस बाकी असताना निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांसमोर पेच
*    अभ्यासपूर्ण आणि अचूक उत्तरे लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असल्याचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा