मुंबई : नीट (यूजी) परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांनी समुपदेशन फेरीसाठी भरलेले सुरक्षा शुल्क परत मिळण्यासंदर्भात सध्या समाजमाध्यमांवर बनावट लिंक व्हायरल होत आहे. ही लिंक राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून (एनटीए) प्रसारित करण्यात आल्याचा दावा करण्यात आल्याने विद्यार्थी व पालक पैसे परत मिळविण्यासाठी आपल्या बँक खात्याची माहिती लिंकवर देत असून, यातून त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीसाठी १० हजार रुपये सुरक्षा शुल्क ‘वैद्यकीय समुपदेशन समिती’कडे (एमसीसी) भरावे लागते. संपूर्ण देशातील केंद्रीय व राज्य कोट्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण एक ते दीड महिन्यांनंतर हे शुल्क विद्यार्थ्यांना परत केले जाते. २०२४ मधील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाची संपूर्ण देशातील प्रवेश प्रक्रिया ही साधारणपणे डिसेंबरच्या मध्यापर्यंत संपली आहे. त्यानंतर दीड महिना उलटला तरी अद्याप हे शुल्क परत मिळालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालक चिंतेत होते. याचाच फायदा घेऊन मागील काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर एक लिंक व्हायरल होत आहे. यामध्ये नीट (यूजी) २०२४ च्या समुपदेशन फेरीसाठी भरलेले शुल्क एनटीएकडून परत दिले जाणार आहेत. या लिंकवर १५ फेब्रुवारीपर्यंत बँक खात्याचा तपशील द्यावा, असे म्हटले आहे. मात्र समाजमाध्यमांवर फिरणारी ही लिकं बनावट असल्याने विद्यार्थी व पालकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, तसेच कोणताही बँक तपशील लिकंमध्ये भरू नये, असे पालक संघटनेच्या सुधा शेणाॅय यांच्याकडून सांगण्यात आले.

समुपदेशन फेरीसाठी लागणारे शुल्क परत करण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एमसीसीच्या संकेतस्थळावर परिपत्रक जाहीर करण्यात येईल. तसेच समुपदेशन फेरीसाठी एमसीसीने शुल्क घेतले आहे. त्यामुळे ते एमसीसीकडूनच विद्यार्थ्यांना परत देण्यात येते. त्याचा एनटीएशी काहीही संबंध नाही. तसेच पैसे परत मिळण्यासाठी काेणत्याही प्रकारचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे बँक खाते मागणारी लिंक तयार करण्यात आली नसल्याचे एमसीसीच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी ज्या खात्यातून शुल्क भरले आहे, त्याच खात्यामध्ये शुल्क परत येते. दुसऱ्या कोणत्याही खात्यात पैसे पाठवले जात नाहीत. त्यामुळे पालकांनी या लिंकवर कोणतीही माहिती भरू नये, असेही स्पष्ट करण्यात आले.

कोणाला शुल्क परत मिळते

– ज्या विद्यार्थ्यांनी समुपदेशन व मुक्त फेरीद्वारे प्रवेश घेतले आहेत.

– ज्या विद्यार्थ्यांना सर्व फेऱ्यानंतरही कोठेच प्रवेश मिळाला नाही.

– प्रवेश न घेता समुपदेशन फेरीतून बाहेर पडलेला विद्यार्थी.