पादचारी पुलाअभावी रूळ ओलांडून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे रेल्वेमंत्र्यांना साकडे
मानखुर्द आणि गोवंडी स्थानकांदरम्यान पादचारी पूल नसल्यामुळे गोवंडी पूर्वेकडील कुमुद विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न उभा राहिला आहे. पूल नसल्याने या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना रूळ ओलांडावे लागतात. विशेष म्हणजे, या ठिकाणी पादचारी पूल उभारण्यासाठी वर्षभरापूर्वी पायाभरणी होऊनदेखील हे बांधकाम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांनी थेट रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनाच साकडे घालण्याचे ठरवले असून यासाठी फेसबुकवर ‘काका मला वाचवा’ असे पेज तयार करून मोहीम राबवण्यात येत आहे.
कुमुद विद्यामंदिर शाळेची इमारत गोंवडी ते मानखुर्द दरम्यान रुळांलगत असून गोवंडी पश्चिमेकडील गौतमनगर, शिवाजी नगर, लल्लुभाई झोपडपट्टीतील मुले या शाळेत येतात. गोवंडीच्या पूर्वेकडील ही एकमेव मराठी माध्यमाची शाळा आहे. शाळेतील कित्येक मुलांचे पालक घरकाम आणि कचरा वेचण्याचे काम करून कुटुंबाचा गाडा ओढत आहेत. बहुतांश मुले एकटय़ाने शाळेत येतात. त्यामुळे, गेल्या ४९ वर्षांपासून या शाळेकडून रेल्वेमंत्र्यांकडे पादचारी पूल बांधण्याची मागणी केली जात आहे. जोरदार पावसात किंवा सायंकाळी शाळा सुटल्यानंतर शाळेचे शिक्षकच मुलांना रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी मदत करतात. शाळेत सुमारे चार हजार मुले शिकत आहेत. ही बहुतांश मुले दररोज या रुळावरून ये-जा करतात. शाळेच्या प्राथमिक वर्गातील लहान लहान मुलांनाही एकेकटय़ाने रूळ पार करावा लागतो, असे कुमुद विद्यामंदिराचे मुख्याध्यापक वंदना उतखेडे यांनी केले.
दोनच दिवसांपूर्वी शाळेची काही मुले रेल्वे रूळ ओलांडताना अपघात होता होता बचावली होती. त्यामुळे पूल बांधण्याची मागणी जोर घेऊ लागली आहे. रेल्वे रूळ ओलांडून ही मुले १० ते १५ मिनिटांत शाळेत पोहोचतात. तर दुसरीकडे देवनारला वळसा घालून ४० ते ५० मिनिटे चालत यावे लागते. त्यामुळे मुले रुळावरून धोका पत्करून येतात, असे उतखेडे यांनी सांगितले.
वेळोवेळी रेल्वेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता या विद्यार्थ्यांनी आणि शाळेने रेल्वेमंत्र्यांकडे आपले म्हणणे पोहोचवण्याचे ठरवले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांद्वारे ‘काका मला वाचवा’ अशी मोहीम सुरू केली आहे.
फेसबुकवर या मोहिमेचे पेज तयार करून त्याला जास्तीत जास्त पाठिंबा मिळवण्यात येत आहे. ‘रोजच्या धोकादायक प्रवासापासून सुरक्षितता मिळावी यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना कृपादृष्टी करावी आणि आमचे रक्षण करावे,’ असे आवाहन या पेजवरून करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा