केंद्र किंवा राज्य सरकारच्या गरिबांसाठीच्या अनेक कल्याणकारी योजना पुरेसा निधी नसल्यामुळे किंवा अंमलबजावणीतील उदासीनतेमुळे कागदावरच राहतात. परंतु राज्यातील आम आदमी शिष्यवृत्ती योजनेला भरघोस आर्थिक तरतूद असूनही लाभार्थी विद्यार्थीच उपलब्ध होत नसल्याने विशेष सहाय्य विभाग चिंतेत पडला आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त गरीब कुटुंबांतील मुलांना लाभ मिळावा यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांचा शोध घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात येणार आहे, असे
समजते.
केंद्र सरकारच्या निराधार व कमकुवत वगार्ंसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनांचा राज्यातील गरीब कुटुंबांना लाभ मिळावा, यासाठी राज्याचे विशेष सहाय्य खात्याचे मंत्री हसन मुश्रीफ सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करीत आहेत. परंतु या विभागाकडे स्वंतत्र अंमलबजावणी यंत्रणा नसल्यामुळे त्याला अपेक्षित यश मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त अनुदानातून आम आदमी विमा योजना सुरु करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेतमजूर तसेच एक हेक्टर बागायत किंवा दोन हेक्टर कोरडवाहू शेती असलेली अल्पभूधारक शेतकरी कुटुंबे या योजनेस पात्र धरली जात आहेत. लाभार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला ७५ हजार रुपये, नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये आणि अपंगत्व आल्यास ३७ हजार ५०० ते ७५ हजार रुपयापर्यंत मदत दिली जाते. २०१२-१३ मध्ये ३६ लाख लाभार्थी कुटुंबांची नोंदणी करण्यात आली होती. विविध दाव्यांच्या ४५७७ प्रकरणांमध्ये १३ कोटी ७३ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. प्रत्यक्षात लाभार्थी कुटुंबांची संख्याही कमी असावी असा या विभागाचा अंदाज आहे. जास्तीत-जास्त लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचीही मोहीम आता सुरु करण्यात येणार आहे.
या योजनेतील सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती. अशा कुटुंबातील ९ वी ते १२ मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना महिना १०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र २०१२-१३ मध्ये राज्यभरातून फक्त ५४ हजार ४९२ विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला. ही संख्या खूपच कमी असल्याचे विशेष सहाय्य विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या वर्षांपासून लाभार्थी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन या योजनेसाठी त्यांची नोंद करण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्याचा विचार आहे. या संदर्भात ग्राम विकास विभागाशी चर्चा करुन लवकरच तसा निर्णय घेतला जाणार आहे, असे सांगण्यात आले.