लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणाचे वेध लागले आहेत. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शिक्षण संस्थांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी प्रक्रिया २७ मेपासून सुरू असून आज दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या https://mum.digitaluniversity.ac/ या अधिकृत संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे बंधनकारक असेल.
आतापर्यंत तब्बल १ लाख ९० हजार २३ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी केली आहे. विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाकडे ४ लाख ५० हजार ५५६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे नामांकित महाविद्यालयात संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी यंदाही मोठी चुरस रंगणार आहे. येत्या सोमवारी १९ जून रोजी सकाळी ११ वाजता पहिली प्रवेश यादी जाहीर होणार आहे.
आणखी वाचा-स्तन प्रत्यारोपणासाठी टाटा रुग्णालयात स्वतंत्र शस्त्रक्रियागृह; महिलांमध्ये जनजागृती करण्यावर भर
विविध अभ्यासक्रमांसाठी मुंबई विद्यापीठाकडे आतापर्यंत ४ लाख ५० हजार ५५६ अर्ज आले आहेत. यंदा पारंपारिक अभ्यासक्रमासह स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांना (सेल्फ फायनान्स) विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. पारंपारिक अभ्यासक्रमांपैकी कला शाखेसाठी ३१ हजार ८८६, विज्ञान शाखेसाठी १८ हजार ८२२ आणि वाणिज्य शाखेसाठी ८७ हजार ७८८ अर्ज दाखल झाले आहेत. बी.एम.एस या अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक ९४ हजार ३१३ अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर बी.एस्स्सी आयटी अभ्यासक्रमासाठी ५५ हजार ६१४ अर्ज, बी.कॉम अंतर्गत येणाऱ्या अकाउंट्स व फायनान्स अभ्यासक्रमासाठी ५३ हजार १५४ अर्ज, बी.एस्स्सी कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमासाठी २७ हजार ९२८ अर्ज, बी.ए.एमएमसी अभ्यासक्रमासाठी (बीएमएम) १९ हजार ६७९ अर्ज आणि बी.एससी बायोटेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी १० हजार ६१६ अर्ज दाखल झाले आहेत.
सोमवारी १९ जून रोजी सकाळी ११ वाजता पहिली प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जासह ऑनलाइन कागदपत्रांची तपासणी व शुल्क २० ते २७ जून (दुपारी ३ वाजेपर्यंत) या कालावधीत भरता येणार आहे.
मुंबई विद्यापीठास प्राप्त झालेले अभ्यासक्रमनिहाय अर्ज
अभ्यासक्रमाचे नाव – अर्जांची संख्या
बी.ए – ३१,८८६
बी.ए.एमएमसी – १९,६७९
बी.एस्स्सी – १८,८२२
बी.एस्स्सी आयटी – ५५,६१४
बी.एस्स्सी कॉम्पुटर सायन्स – २७,९२८
बी.एस्स्सी बायोटेक्नॉलॉजी – १०,६१६
बी.कॉम – ८७,७८८
बी.कॉम (अकाउंट्स व फायनान्स) – ५३,१५४
बी.एम.एस – ९४, ३१३