मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनागोंदी कारभारामुळे २०१९-२० मधील एमबीबीएसच्या मागास व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शिष्यवृत्तीसाठीच्या अंतिम तारखेच्या चार दिवस अगोदर महाविद्यालयाने शुल्क भरण्यासंदर्भातील नोटीस जाहीर केली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शुल्क भरून महाडीबीटीवर शिष्यवृत्तीचा अर्ज भरणे शक्य झाले नाही. परिणामी, जवळपास ७० ते ८० विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयात २०१९-२० मध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाने २६ फेब्रुवारी २०२० रोजी शुल्क भरण्यासंदर्भात नोटीस जारी केली होती. शुल्क भरण्यासाठी ११ मार्च २०२० पर्यंत मुदत देण्यात आली होती. तसेच मागास व आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी २९ फेब्रुवारपर्यंत मुदत होती. शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी शुल्क भरणे आवश्यक आहे. मात्र शुल्कासंदर्भातील नाेटीस जारी केल्यानंतर विद्यार्थ्यांकडे तात्काळ वार्षिक शुल्क भरण्यासाठी पैसे नव्हते. तसेच बँकेतून डीडी काढून शुल्क भरणे आणि शिष्यवृतीचा अर्ज २९ फेब्रुवारीपर्यंत महाडीबीटी संकेतस्थळावर दाखल करणे विद्यार्थ्यांना शक्य झाले नाही. परिणामी, या विद्यार्थ्यांनी १९ मार्चपर्यंत महाविद्यालयाचे शुल्क भरूनही सुमारे ७० – ८० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले आहे.
हेही वाचा – VIDEO: विहार आणि तानसा ओसंडून वाहू लागले
कोरोनामुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे सर्व कार्यालये व महाविद्यालये बंद होती. परिणामी, २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना दाद मागता आली नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी याबाबत महाविद्यालय व समाज कल्याण विभागाकडे वारंवार चौकशी केली, मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. वेळेवर शुल्क भरल्यानंतरही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले आहे. महाविद्यालयाकडून या विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्क भरण्यास सांगण्यात येत असून, दंडाच्या रकमेसह शुल्क न भरल्यास त्यांना शैक्षणिक कागदपत्रे दिली जाणार नाहीत, असे महाविद्यालय प्रशासनाने बजावले आहे. याची शिवसेनेने दखल घेतली असून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची समस्या ऑफलाईन पद्धतीने सोडविण्याबाबतचे आदेश समाज कल्याण विभागाला देण्यात यावे, अशी विनंती करणारे पत्र शिवसेना सचिव सिद्धेश कदम, माजी सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात आणि महाविद्यालय कक्ष सचिव ओमकार चव्हाण यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना दिले आहे.