महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींकरिता वरळी येथे ‘सामाजिक न्याय विभागा’च्या वतीने चालविल्या जाणाऱ्या तीन वसतिगृहांमध्ये गेले चार दिवस पाणी नसल्याने शेकडो विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते आहे. या वसतिगृहात तब्बल १०० मुली राहतात. पिण्यासाठी तर सोडाच पण वैयक्तिक स्वच्छतेकरिताही पाणी नसल्याने त्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे.
वरळीच्या बीडीडी चाळीत असलेल्या या वसतिगृहांमध्ये मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी राहतात. मुलांसाठी दोन आणि मुलींसाठी एक अशा तीन वसतिगृहांमध्ये मिळून पावणे तीनशेच्या आसपास विद्यार्थी-विद्यार्थिनी राहत आहेत. या वसतिगृहांना पाणीपुरवठा करणारी मोटार चार दिवसांपूर्वी बिघडली. तेव्हापासून या इमारतींना पाण्याचा पुरवठा बंद आहे.
ही वसतिगृहे सामाजिक न्याय विभागामार्फत चालविली जात असली तरी इमारतींच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र, चार दिवस मीटर दुरुस्त करून वा नवी बसवून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात विभागाला यश आलेले नाही. एकाच मोटरने तिन्ही वसतिगृहांना पाणीपुरवठा केला जातो. पाणी साठवून ठेवण्याची सोय नाही. थेट नळाद्वारे पाणीपुरवठा होतो. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. विद्यार्थी खालच्या टाकीतून बादलीच्या साहाय्याने गरजेपुरते पाणी भरून आणतात. त्यामुळे आंघोळीची तरी सोय होते. परंतु कपडे वगैरे धुण्याकरिता बादल्या भरून भरून पाणी आणणे शक्य होत नाही. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तर यामुळे चांगलाच त्रास होतो. याशिवाय स्वयंपाकगृहे, स्वच्छतागृहे, शौचालयांमध्येही पाणी नसल्याने स्वच्छतेअभावी दरुगधी भरून राहिली आहे.
यासंदर्भातील तक्रारीनंतर सामाजिक न्याय विभागाचे मुंबई विभागाचे उपायुक्त यशवंत मोरे यांनी या प्रकाराची दखल घेत अधिकाऱ्यांना नवीन मोटार बसविण्याचे आदेश दिले आहेत.

असे हाल नेहमीचेच
या तिन्ही वसतिगृहांच्या व्यवस्थापनाकडे दोन्ही विभाग दुर्लक्ष करतात. त्यामुळे येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कायम कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करत येथे राहावे लागते. आता पाणीपुरवठाच बंद झाल्याने मुलांच्या हालांमध्ये भर पडली आहे. येथे राहणाऱ्या सुमारे १०० मुलींची अवस्था तर फारच बिकट आहे. कारण पाण्याची टाकी मुलींच्या वसतीगृहापासून फारच लांब आहे.
मनोज टेकाडे, अध्यक्ष, प्रहार विद्यार्थी संघटना.

Story img Loader