दहावीत अनुत्तीर्ण होणे म्हणजे ‘मुलगा/मुलगी वाया गेल्या’चा हमखास शिक्का. मात्र, आता हा नापासाचा शिक्का गुणपत्रिकेवरून कायमचा हद्दपार होणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून नापास हा शेराच असणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली. ज्या विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण होता येणार नाही, त्यांना कौशल्य विकास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दरम्यान, यंदा दहावीला उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांची लगेचच जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ात फेरपरीक्षा घेण्यात येणार असून २० ऑगस्ट रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचणार आहे.
दहावीत उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना पुढे आयुष्यभर हा नापासाचा टिळा कपाळावर वागवावा लागतो. त्यांच्या गुणपत्रिकेवरच नापासाचा शेरा असल्यामुळे पुढील शैक्षणिक मार्गातही अनेक अडथळे येतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होते. या पाश्र्वभूमीवर दहावीत नापासाचा शेराच काढून टाकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती तावडे यांनी गुरुवारी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये काही सुप्त गुण असताता. केवळ शैक्षणिक अभ्यासातून ते स्पष्ट होऊ शकतीलच असे नाही. त्यासाठी पुढील वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकासाचा विचार केला जाईल. ज्या विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण (कौशल्य विकास) असे प्रमाणपत्र मिळेल. त्यांना विज्ञान, वाणिज्य व कला माहाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. त्याऐवजी त्यांना कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापुढे ‘नापास’ असा शिक्का नसेल.
अभ्यासगटाची स्थापना
एकीकडे नापासांची चिंता करतानाच दुसरीकडे भरमसाठ गुण मिळाल्याप्रकरणीही प्रश्न उपस्थित करत अभ्यासगटामार्फत चौकशी करण्याचा निर्णय तावडे यांनी जाहीर केला. भाषा विषयातही विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाल्यामुळे काही तज्ज्ञांनी शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी चिंता व्यक्त केली. त्यामुळे निकालाची गुणवत्ता, शिक्षणपद्धती, परीक्षा पद्धती आणि गुणांकन पद्धती यामध्ये बदल करण्याची गरज आहे का, याचा विचार हा अभ्यासगट करणार आहे. सुमारे ३५० शाळांचे निकाल ५० टक्क्य़ांपेक्षा कमी लागले असून अशा शाळांचे संस्थाचालक व मुख्याध्यापकाची जूनअखेरीस बैठक घेतली जाईल, असेही तावडे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा