ठाणे येथील राजीव गांधीनगर परिसरातील राजर्षी शाहू महाराज विद्यालयाजवळच असलेल्या संत ज्ञानेश्वरनगर येथील पुलावरून बुधवारी सकाळी कचऱ्याचा डम्पर गेल्याने त्यातील दुर्गंधी शाळेच्या वर्गामध्ये पसरली. त्यामुळे शाळेतील पाच विद्यार्थ्यांना उलटी, मळमळणे, आदी त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. या सर्वावर उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरात विषबाधा झाल्याची अफवा पसरली होती.  
राजर्षी शाहू महाराज विद्यालयामध्ये इयत्ता आठवीत शिकणारी ही मुले वर्गात असताना पुलावरून गेलेल्या डम्परमधील कचऱ्याची दुर्गंधी वर्गात पसरली. त्यानंतर थोडय़ा वेळातच पाच विद्यार्थ्यांना उलटय़ा, मळमळणे, आदी त्रास होऊ लागल्याने जवळच असलेल्या स्वस्तिक रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती शाळेचे संस्थापक सुर्यकांत सकट यांनी दिली.
ही शाळा संत ज्ञानेश्वरनगर पुलाजवळच असून तेथून वाहनांची मोठय़ा प्रमाणात ये-जा सुरू असते. तसेच वागळे येथील सिपी तलाव परिसरात घंटागाडीमधील कचरा खाली करण्यात येतो. मात्र, सध्या शहरात घंटागाडी कामगारांचा संप सुरू असल्याने डम्पर तसेच कॉम्पेक्टर्सद्वारे कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून कचऱ्यांच्या डम्परचीही ये-जा सुरू असते.  

Story img Loader