परीक्षा पुढे ढकलण्याची मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’वर नामुष्की
मुंबई : मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था म्हणजेच ‘आयडॉल’तर्फे विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष एम.एम.एस द्वितीय सत्र ‘आर्थिक व्यवस्थापन’ (फायनान्शियल मॅनेजमेंट) विषयाच्या परीक्षेला प्रथम सत्र ‘आर्थिक लेखा’ (फायनान्शियल अकाउंटिंग) या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. विद्यार्थ्यांनी तात्काळ हा प्रकार आयडॉल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा >>> “मग मुंबईचे रस्ते बंद करावेत का?”, कर्मचाऱ्यांना मराठा आरक्षण सर्वेक्षणात जुंपल्याने HC ने मुंबई पालिकेला फटकारले
मुंबई विद्यापीठाच्या ‘आयडॉल’तर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत पदव्युत्तर प्रथम वर्ष एम.एम.एस (दोन वर्षीय अभ्यासक्रम) द्वितीय सत्र ‘आर्थिक व्यवस्थापन’ या विषयाची परीक्षा मंगळवार, २३ जानेवारी रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत नियोजित होती. ही परीक्षा ७५:२५ या पॅटर्ननुसार होती. प्रश्नपत्रिकेवर ‘आर्थिक व्यवस्थापन’ असेच विषयाचे नाव नमूद करण्यात आले होते. मात्र विद्यार्थ्यांनी जेव्हा ही प्रश्नपत्रिका वाचण्यास सुरुवात केली, तेव्हा संपूर्ण प्रश्नपत्रिका प्रथम सत्र ‘आर्थिक लेखा’ या विषयाची असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा एकच गोंधळ उडाला आणि त्यांनी हा धक्कादायक प्रकार आयडॉल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर आयडॉलकडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ही परीक्षा विद्यापीठाच्या कलिना संकुलातील ‘आयडॉल विभाग’ या एकाच परीक्षा केंद्रावर होती आणि एकूण ७४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
‘आयडॉलमध्ये सर्व विद्यार्थी हे नोकरी सांभाळून शिक्षण घेत असतात. त्यामुळे परीक्षा गोंधळामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ‘आर्थिक व्यवस्थापन’ या विषयाची परीक्षा सुरू झाल्यानंतर काहीच मिनिटांत प्रश्नपत्रिका ही ‘आर्थिक लेखा’ या विषयाची असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला. एका विषयाच्या एकूण तीन प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडे तयार असणे आवश्यक आहे, मात्र एकही पर्यायी प्रश्नपत्रिका उपलब्ध नसल्यामुळे ‘आर्थिक व्यवस्थापन’ विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कोणत्याही गोष्टीचे पूर्वनियोजन आयडॉल प्रशासनाकडे नाही. विविध गोष्टींमध्ये ऐनवेळी बदल केले जात असल्यामुळे विद्यार्थी भरडले जात आहेत’, अशी खंत एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर व्यक्त केली.
हेही वाचा >>> तमिळ भाषिक सफाई कामगारांना मराठा सर्वेक्षणाचे काम
‘मुंबई विद्यापीठाने सातत्याने परीक्षा गोंधळ करून विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये. पर्यायी प्रश्नपत्रिका उपलब्ध नसणे, यावरून ‘आयडॉल’चे शून्य नियोजन स्पष्ट होते. अभ्यास साहित्य वेळेत न मिळणे, यानंतर आता प्रश्नपत्रिकेसंबंधित तक्रारी येत आहेत. मुंबई विद्यापीठाला सर्वाधिक आर्थिक उत्पन्न हे आयडॉल विभागाकडून प्राप्त होते. मात्र दिवसेंदिवस खालावत चाललेला आयडॉलचा शैक्षणिक दर्जा सुधारणार कधी ? पूर्णवेळ कुलगुरू, प्र – कुलगुरू येऊनही विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला नाही’, असे मत ठाकरे गटाच्या युवा सेनेचे माजी अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी व्यक्त केले.
दरम्यान, अलीकडेच मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष विधी शाखेच्या (तीन वर्षीय अभ्यासक्रम) प्रथम सत्र परीक्षेत ‘लेबर लॉ ॲण्ड इंडस्ट्रियल रिलेशन’ या विषयाची प्रश्नपत्रिका नवीन अभ्यासक्रमाऐवजी जुन्या अभ्यासक्रमानुसार देणे आणि ‘लॉ कॉन्ट्रॅक्ट ॲण्ड स्पेसिफिक रिलीफ’ या विषयाच्या प्रश्नपत्रिकेवर प्रश्नांच्या बाजूला देण्यात येणाऱ्या गुणांची बेरीज ही ७५ ऐवजी ३७ असणे, असे प्रकार घडले होते. मुंबई विद्यापीठातर्फे परीक्षेसंबंधित गोंधळाची मालिका सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असून विद्यार्थी संघटनांकडूनही टीकेची झोड उठत आहे, तसेच परीक्षा गोंधळामध्ये कुलगुरूंनी विशेष लक्ष घालून ठोस भूमिका घेण्याची मागणीही होत आहे.
तांत्रिक कारणास्तव घोळ झाला
‘सकाळच्या सत्रात मंगळवार, २३ जानेवारी रोजी ‘आयडॉल’ची एमएमएस सत्र २ या अभ्यासक्रमाची परीक्षा होती. परंतु काही तांत्रिक कारणास्तव द्वितीय सत्र ‘आर्थिक व्यवस्थापन’ ऐवजी प्रथम सत्र ‘आर्थिक लेखा’ या विषयाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही बाब आयडॉलच्या लक्षात आल्यानंतर ‘आर्थिक व्यवस्थापन’ विषयाची आयडॉलकडे उपलब्ध असलेली प्रश्नपत्रिका देण्याची तयारी सुरू केली. परंतु या विषयाची परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांनी मागणी केली. त्यानुसार द्वितीय सत्र ‘आर्थिक व्यवस्थापन’ या विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून आता या विषयाची परीक्षा रविवार, ११ फेब्रुवारी रोजी घेण्यात येईल’, असे आयडॉल विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.