स्कूल बसेस नियमांची अंमलबजावणी करतात किंवा नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी समित्या नेमण्याच्या परिवहन विभागाच्या सूचनेला शाळांकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्याने स्कूल बस कंत्राटदारांची मनमानी सुरू आहे. याचा फटका विद्यार्थ्यांनाच बसला असून सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करायची झाली तर सध्याचे भाडे दुप्पट करावे लागेल, असा इशारा या कंत्राटदारांनी दिला आहे.
सुरक्षा नियमांची अंमलबजावणी केली नसेल किंवा शाळांनी करार केलेला नसेल अशा बसेसवर परिवहन विभाग कारवाई करत असल्यामुळे सोमवारी अनेक बसेस विद्यार्थ्यांना नेण्यास येणार नाहीत आणि त्याची जबाबदारी बस कंत्राटदारांवर नाही, असा इशारा ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’ने दिला होता. परिवहन विभागाने कारवाई कायम ठेवली असली तरी कोणत्याही बसेस रस्त्यात थांबवल्या नसल्याचे सांगण्यात आले. पूर्व उपनगरांमध्ये १२ बसेसच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असता त्यात सात बसेसच्या चालकांकडे योग्य कागदपत्रे नसल्याने त्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पश्चिम उपनगरांमध्येही ७० बसेसची तपासणी करण्यात आल्याचे असोसिएशनतर्फे सांगण्यात आले. परिवहन विभागाची कारवाई टाळण्यासाठी काही कंत्राटदारांनी बसेस रस्त्यावर आणल्या नसल्याने दहिसर, बोरिवली आणि कांदिवली येथील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. तर मुलुंड, दादर, ग्रँट रोड, चर्नी रोड, पवई येथेही परिवहन विभागाने कारवाई करून त्यांना कारणे दाखवा नोटीस दिल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात आले.
विद्यार्थी असलेल्या बसवर कारवाई करू नका असे आदेश देण्यात आले आहेत. अशा बसेसची तपासणी शाळांच्या परिसरातच करा म्हणजे विद्यार्थ्यांचे हाल होणार नाहीत, अशा आशयाच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे परिवहन आयुक्त व्ही. एन. मोरे यांनी सांगितले. मोठय़ा बसेसमधून सुरक्षा नियमांचे पालन योग्य प्रकारे होते किंवा नाही हे पाहण्यासाठी शाळांनी प्राचार्याच्या अध्यक्षतेखाली समित्या नेमण्यात याव्यात, अशी सूचना परिवहन विभागाने केली होती. मात्र त्याला शाळा व्यवस्थापनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या असून त्याचाच गैरफायदा असोसिएशन घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांच्या समित्यांमध्ये प्राचार्यच अध्यक्ष असून परिवहन विभागाचा अधिकारी, स्थानिक पोलीस ठाण्याचा अधिकारी, वाहतूक विभागाचा अधिकारी आणि शिक्षण विभागाचा अधिकारी त्याचप्रमाणे पालकांचे प्रतिनिधी आदींचा समावेश असणार आहे. मात्र या समित्याच स्थापन झालेल्या नाहीत आणि त्यामुळे छोटय़ा वाहनांच्या चालकांना धमकावणे, परस्पर बसचा मार्ग बदलणे, चालकांकडे वाहन परवाना नसणे आदी प्रकारांबरोबरच बसेसमध्ये स्वच्छता नसणे आदी प्रकार घडत आहेत. अशा बसचालकांवर कारवाई करण्यास असोसिएशन तयार नसल्याचेच दिसून आले. सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करायची झाल्यास सध्याचे आकारण्यात येत असलेले बसभाडे दुप्पट करावे लागेल अन्यथा शाळांनी त्याची भरपाई करावी अशीही भूमिका काही कंत्राटदारांनी घेतली आहे.

Story img Loader