लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : ट्रक आणि बसचालकांनी देशव्यापी संप पुकारला असून, या संपाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता आहे. नाताळच्या सुट्ट्या संपून २ जानेवारीपासून शाळा सुरू झाल्या असून शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणारे शालेय बस चालक-मालकही सज्ज झाले आहेत. मात्र मुंबईतील बहुसंख्य पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, डिझेल उपलब्ध होऊ शकले नाही, शालेय बस धावणार नाहीत, असा पवित्रा स्कूल बस मालक संघटनेने घेतला आहे.

केंद्र सरकारने ‘हिट ॲण्ड रन’ कायद्यात बदल केल्यानंतर देशभरातील ट्रकचालक आक्रमक झाले आहेत. नव्या वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी वाहनचालकांनी देशभरात संप पुकारला असून अवजड वाहने अनेक ठिकाणी रस्त्यावरच उभी आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधनासह जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ लागला आहे. फळे, भाजीपाला, दूध आदीं वस्तूंबरोबरच पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. परिणामी, आपापल्या वाहनांमध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी वाहनचालक पेट्रोल पंपावर धाव घेत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर सकाळपासून वाहनांच्या रांगा लागू लागल्या आहेत. तर, मंगळवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. काही शालेय बसगाड्या डिझेलवर धावत आहेत. तूर्तास शालेय बस सेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. शालेय बसगाड्यांमधून आज विद्यार्थी शाळेत पोहचले. मात्र इंधनाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर डिझेलवर धावणाऱ्या शालेय बसगाड्या चालविणे अवघड होणार आहे. त्याचा थेट फटका विद्यार्थ्यांना बसेल, असे स्कूल बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आणखी वाचा-जानेवारीअखेरीस ई लिलाव, १७० दुकानांसाठी जाहिरात; म्हाडाच्या मुंबई मंडळाची नववर्षाची भेट

मुंबईतील अनेक पेट्रोल पंपावर मंगळवारी सकाळपासून वाहनचालकांची वाहनामध्ये पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी गर्दी केली होती. तसेच बोरिवली येथील पेट्रोल पंपावरील वाहनांच्या रांगेत शालेय बसगाड्याही उभ्या होत्या. त्यामुळे बसमध्ये आज डिझेल भरले नाही, तर बुधवारपासून शालेय बस सेवा बंद होईल. -अनिल गर्ग, अध्यक्ष, स्कूल बस मालक संघटना

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students hit by truck drivers strike signs of bus service halted due to lack of diesel mumbai print news mrj