मुंबई : मुंबईतील पुढील तीन दिवसांच्या पावसाचा अंदाज, नद्यांची पातळी, पूराची शक्यता याची माहिती मोबाईल उपयोजनाच्या (ॲप) माध्यमातून मिळणार असून आयआयटी मुंबईच्या हवामान अभ्यास विभागाचे विद्यार्थी आणि स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘मुंबई फ्लड’ नावाचे वेबपोर्टल आणि अॅपची निर्मिती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> दिल्ली-मुंबई विमान तब्बल आठ तास उशीरा

मुंबईत अनपेक्षितपणे एखाद्याच ठिकाणी होणारा मुसळधार पाऊस आणि त्यानंतर पाणी तुंबणे, पूरसदृश स्थिती, वाहतुकीचा खोळंबा याला मुंबईकरांना तोंड द्यावे लागते. या सगळ्याची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर मिळावी असा प्रयत्न आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. ‘मुंबई फ्लड’ नावाने तयार केलेले संकेतस्थळ आणि ॲपवर मुंबईतील पुढील तीन दिवसांचा पावसाचा अंदाज देण्यात येईल. तो विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या डाउनस्केलिंग मॉडेलवर आधारित असेल. तसेच मिठी नदी, वाकोला नाला यांची पाण्याची पातळी मोजून माहिती अद्ययावत करण्यात येईल. स्थानिकांना वेळोवेळी पावसाच्या नोंदी संकेतस्थळावर तात्काळ पाहता येतील. मुंबईतील पाऊस आणि पाणी साचल्यास त्याची माहिती, विविध समाजमाध्यमांवर त्याबाबतची चर्चा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जातील.

हेही वाचा >>> मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत ३५ टक्के साठा, गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा

एचई-आयआयटीबी इनोव्हेशन सेंटरने या प्रयोगासाठी विद्यार्थ्यांना निधी सहाय्य दिले आहे. संकेतस्थळ आणि उपयोजनाच्या निर्मितीचे काम एमसीजीएम सेंटर फॉर म्युनसिपल कॅपेसिटी बिल्डिंग अँड रिसर्च (एमसीएमसीआर)च्या सहकार्याने करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे पर्यवेक्षण प्राध्यापक रघु मुर्तुगुड्डे आणि सुबमिल घोष यांनी केले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Students of iit bombay developed app for rainfall information mumbai print news zws