मुंबई : मुंबईतील शाळा सुरू होऊन महिना झाला आहे. मात्र, अद्यापही मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. शैक्षणिक साहित्य वाटपातील विलंबाबाबत पालिका प्रशासनावर विविध स्तरातून टीका केली जात आहे.
दरवर्षी जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, दप्तर, रेनकोट, बूट आदी २७ प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचे वाटप केले जाते. मात्र, यंदा शाळा सुरू होऊन महिना उलटला तरीही विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित आहेत. परिणामी, पालिकेला नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही परिणाम होत आहे.
मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या पालिकेच्या बहुतांश मुंबई पब्लिक स्कूलमध्ये बाक आणि बाकड्यांची सुविधा उपलब्ध झालेली नाही. पूर्वीच्या जुन्या शाळांमधील बाकड्यांचीही अवस्था दयनीय झाली असून पालिका याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे.