मुंबई : सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या शाखेला वाढती मागणी असली तरी अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी नोंदवलेल्या पसंतीक्रमानुसार त्यांची सर्वाधिक पसंती ही संगणक शाखेला (कम्प्युटर इंजिनियरिंग) आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान (आयटी), इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग या अभ्यासक्रमांकडे कल आहे. चौथ्या क्रमांकाची पसंती एआय शाखेला विद्यार्थ्यांनी दिली आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) अभियांत्रिकी प्रथम वर्ष (बीई/ बीटेक), एमबीए पदवी प्रवेशासाठी अर्ज नोंदणी प्रक्रियेनंतर बुधवारी रात्री पहिली यादी जाहीर केली. विविध ९८ अभ्यासक्रमांपैकी बांधकाम (सिव्हिल), यांत्रिकी (मेकॅनिकल) शाखेला विद्यार्थ्यांची अधिक पसंती असायची. मात्र गेल्या दशकापासून हा कल बदलल्याचे दिसून येत आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान एक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांसाठी विविध महाविद्यालयांसाठी पसंती नोंदवू शकतो. त्यानुसार अर्ज दाखल केलेल्या सात लाख विद्यार्थ्यांनी ९८ शाखांसाठी ७२ लाख ९१ हजार ८३२ पसंतीक्रम नोंदवले. त्यात सर्वाधिक पसंती संगणक अभियांत्रिकीला असून १९ लाख २७ हजार ४८५ वेळा पसंती नोंदवली आहे. अर्ज केलेल्यापैकी २२ हजार ६५८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. त्याखालोखाल आयटीसाठी १३ लाख ४२ हजार ३३३ वेळा पसंती नोंदवली असून, ११ हजार ३३ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनसाठी १० लाख ५६ हजार १६० अर्ज असून, १४ हजार ७४७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
हे ही वाचा… शिंदे सरकार अदानींच्या खिशात; आदित्य ठाकरे यांची जोरदार टीका
एआय आणि डेटा सायन्ससाठी ६ लाख २ हजार ९२ अर्ज आहेत. त्यातील ७ हजार ९५४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. एआय-मशिन लर्निंग विषयासाठी एक लाख २८ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली असून या शाखेसाठी २१६२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे.
हे ही वाचा… भाजप-शिंदे गटात चढाओढ; रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा जोरदार प्रचार
अभ्यासक्रम – नोंदवलेली पसंती
कम्प्युटर इंजिनियरिंग – १९२७४८५
इन्फार्मेशन टेक्नोलॉजी – १३४२३३३
इलेक्ट्रॉनिक ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग – १०५६१६०
आर्टिफिशियल इंटिलिजन्स ॲण्ड डाटा सायन्स – ६०२०९२
कम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग – ५३१४६९
मेकॅनिकल इंजिनियरिंग – ३७०५७७
इलेक्टिकल इंजिनियरिंग – २२९९४०
सिव्हिल इंजिनियरिंग – २०३१३३
कम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग (आर्टिफिशियल इंटिलिजन्स ॲण्ड मशीन लर्निंग) – १७०८७४
एआय ॲण्ड डाटा सायन्स – १५३२२६
आर्टिफिशियल इंटिलिजन्स ॲण्ड मशीन लर्निंग – १२८७५८
कम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनियरिंग (डाटा सायन्स) – ११३८३६